नागपंचमीचा आदला दिवस म्हणजे श्रावण शुक्ल चतुर्थी, तिला आपण विनायकी चतुर्थी म्हणतो, ही चतुर्थी नागपंचमीच्या आदल्या दिवशी असल्याने तिला विनायक नागचतुर्थी' अशीही ओळख आहे. आपल्या इथे नागपंचमीचा सण जसा साजरा केला जातो, तसा आंध्र प्रदेशात नागपंचमीचा आदला दिवस म्हणजे विनायक नागचतुर्थीचा दिवस 'नागुलचवती' या नावाने साजरा होतो. नावात साम्य आढळले, तरी हा सण साजरा करण्यामागे दोन्ही राज्यातील कारणे वेगवेगळी आहेत.
हे दोन्ही सण हिंदू संस्कृतीचा संदर्भ घेऊन साजरे केले जात असले, तरीदेखील स्थानिक लोकसंस्कृतीचा त्यावर प्रभाव दिसून येतो. महाराष्ट्रात नागपंचमी साजरी करण्यामागे कृष्ण कथेचा संदर्भ वापरला जातो - भगवान श्रीकृष्णाने लहानपणी यमुना नदीतील कालिया नावाच्या विषारी नागाला लोळवून गोकुळास भयमुक्त केले होते, अशी कथा आहे. हा कालिया मर्दनाचा प्रसंग श्रावण शुद्ध पंचमीला घडला होता असेही सांगितले जाते. या धारणेला अनुसरून नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो.
तर आंध्र प्रदेशात या सणाला समुद्र मंथनाची पार्श्वभूमी सांगितली जाते. श्रावण शुक्ल चतुर्थीला झालेल्या समुद्र मंथनातून हलाहल निघाले ते भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यावेळेस त्यांच्या देहाचा झालेला दाह शांत करण्यासाठी त्यांनी नाग, साप अंगावर गुंडाळून घेतले होते. तेव्हापासून त्यांना कायमस्वरूपी महादेवाच्या गळ्यात स्थानापन्न होण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे सर्प योनी जशी पावन झाली, तशी नागुलचवती साजरी करून आपलाही जन्म सार्थकी लागावा हा भोळा भाव त्यामागे असतो.
असे संदर्भ वेगळे असले तरी पूजा विधी सारखा असतो. आंध्र प्रदेशातील बायका या दिवशी वारुळाजवळ जाऊन नागासाठी दूध ठेवतात. आपल्या घरातील गायी गुरांना त्यांच्यापासून त्रास होऊ नये, आपल्या कुटुंबियांचे सर्प दंशापासून रक्षण व्हावे या आशेने हा पूजा विधी केला जातो.
इतर जीवसृष्टी तसेच प्राणीसृष्टीबद्दल प्रेम, दया, कृतज्ञभाव दर्शवण्यासाठी गरुड, कोकिळा, राजहंस, मोर आदि पक्षी, तसेच वाघ, सिंह, गाय, वृषभ, महिष, घोडा, उंदिर, श्वान आदि प्राणी यांचे आपण कृतज्ञता भावाने पूजन व गुणगान करत आलो आहोत. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे हा याच परंपरेचा एक भाग आहे. यंदा १३ ऑगस्ट, शुक्रवार रोजी नागपंचमी आहे त्यानिमित्ताने आपणही सृष्टिरक्षकाचे रक्षण करूया आणि त्याची प्रतीकात्मक पूजा करूया.