श्रावण मास हा पुण्य साच्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त पुण्य गाठीशी बांधता यावे, म्हणून सलग महिनाभर उपासना करायला हवी. एखाद वेळेस खंड पडला तर पुन्हा सातत्य ठेवून श्रावण मासात उपासनेचा संकल्प करायला हवा. ही उपासना कोणत्याही प्रकारे असू शकते. साध्या नामजपापासून ते पोथीवाचनापर्यंत काहीही. एखाद्या स्तोत्राची नियमित आवर्तने, देवदर्शन असा जो नेम आपण सातत्याने करू शकू तो श्रावण मासाचा संकल्प करावा. या संकलपूर्तीचा आनंद वेगळाच असतो. त्याची अनुभूती घेता यावी म्हणून उदाहरणादाखल सौ. अस्मिता दीक्षित पुढे काही संकल्प देत आहेत.
१. श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायाचे नित्य वाचन (२१ दिवसात पारायण होते )२. श्री सूक्ताचे नित्य पठण ( रोज १६ वेळा म्हणायचे आहे १५ वेळा + फलश्रुती असे १६ वेळा )३. श्री शनी महात्म पठण / शनी महाराजांचा जप ओं शं शनैश्चराय नमः ४. दर सोमवारी घरातील शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक.५. मंगळवार / शुक्रवार जो आपल्या कुल्स्वमिनीचा वार असेल त्या दिवशी कुंकुमार्चन .६. सप्तशती पाठ , गुरुचरित्र , साई चरित्र अश्या पवित्र ग्रंथांचे वाचन ७. दर शनिवारी ४ चमचे हळद घेवून त्यात गोमुत्र घालून घराचा उंबरठा सारवणे ८. गायत्री मंत्राचे सकाळी नित्य पठण आणि सूर्य नमस्कार ९. श्री स्वामी समर्थ नित्य जप ( रोज निदान ११ माळा ) / श्री गजानन बावन्नी
१०. शुक्रवारी देवीला खीर पुरणाचा नेवैद्य (निदान एक तरी शुक्रवार )/ महालक्ष्मीचा जप- ओं श्री महालक्ष्मै माताय्ये नमः११. श्रावण सोमवारी लघुरुद्र / महादेवाचा जप ओं नमः शिवाय १२. श्रावण शनिवार किंवा पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजा १३. अनेक घरातून जिवतीचे पूजन केले जाते – कुलाचार १४. श्रावणातील शुक्रवारी घरातील देवीला आणि एक शुक्रवार देवीच्या देवळात जावून देवीची ओटी भरावी . घरात भरलेल्या ओटीतील सर्व साहित्य फळे, तांदूळ , श्रीफळ घरात वापरावे. श्री सुक्त म्हणावे .१५. ह्या सर्वांच्या पलीकडे असणारी उपासना म्हणजे “ अन्नदान “ पण ते कुणाला ? तर ज्याला खरच पोटाला तडस लागली आहे त्याला. म्हंटलेच आहे .
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।।जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||
सर्वात मोठा यज्ञ जो पोटात पेटला आहे त्याला अन्नाचा घास ( आहुती ) भरवणे हे सर्वात मोठे पुण्य आहे आणि म्हणूनच भुकेलेल्या आणि गरजू कष्टकरी अश्या व्यक्तीला शिधा /अन्न दान केले, तर त्याचे पुण्य अफाट आहे. जे रोजच श्रीखंड पुरी खात आहेत त्यांना बोलवून पुण्य मिळणार नाही कारण त्यांना त्याची आवश्यकता नाही पण जे एकवेळच्या दोन घासालाही कष्ट करूनही तरसत आहेत अश्यांना अन्नदान केले तर त्यांचे आशीर्वाद नक्कीच फळतील आणि आपणही योग्य व्यक्तीला दान केल्याचे समाधान मिळेल .
उपासना कुठलीही असावी पण त्यात सातत्य असणे आवश्यक आहे . ह्या उपासना आपण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आणि आत्मिक समाधानासाठी करत आहोत . दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही त्यामुळे त्याची वाच्यता करू नये. म्हणूनच आपली नित्य कर्मे करत असताना जितके जमेल ते करावे पण जे करू ते प्रामाणिकपणे मनापासून तरच त्याला अर्थ आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या सर्व उपासनांना जोड हवी ती शुद्ध , पवित्र मनाची. नामस्मरण , मनन , चिंतन करावे. उगीचच कुणाचीतरी निंदा नालस्ती करू नये . आपली वास्तू शुद्ध , स्वच्छ ठेवली तरच लक्ष्मीची कृपा होऊन तिचा वास चिरकाल आपल्या वस्तुत राहील.
आजपासून घरोघरी हा श्रावण सोहळा करुया आणि आयुष्यातील हे सर्व क्षण सोनेरी करुया . परमेश्वरी सेवा कधीही फोल जाणार नाही त्याची अपिरीमित शुभ फळे जन्मोजन्मी मिळणारच. चलातर मग श्रावणसरी अंगावर घेवून त्याचे स्वागत करुया आणि श्रावणाचा आनंद मनसोक्त लुटुया.