Shravani Guruwar 2023: मराठी वर्षात महत्त्वाचा मानला गेलेला सात्विक काळ चातुर्मास सुरू झाला. संपूर्ण मराठी वर्षात चातुर्मासाला सर्वाधिक महत्त्व आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आल्यामुळे चातुर्मास विशेष ठरला. यानंतर आता निज श्रावण मास सुरू झाला आहे. श्रावणातील दुसरा गुरुवार, २४ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. श्रावणी गुरुवारी बृहस्पति पूजन केले जाते. श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्याचे म्हटले जाते. माणूस विविध माध्यमातून भगवंताला भजत-पूजत असतो. आयुष्याचे कल्याण व्हावे, सुख-समृद्धी लाभावी, पैसा-अडका, धन-धान्य-वैभव प्राप्त व्हावे, यासाठी करत असलेल्या कष्टासह आपल्या आराध्याला प्रार्थनाही करत असतो.
अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. स्वामींनी समाजाला ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हा दिलासा दिला. खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा विश्वास आजही हजारो भक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले, तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ 'श्री स्वामी समर्थ' असा नामोच्चार केला, तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते. प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही. का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज एक दृष्टांत देऊन सांगतात.
सगळे भक्त स्वामींना शरण गेले
एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळे जण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असेच चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल. या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, 'अरे अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा. प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली, तर तो तुमचं नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एकदिलाने प्रार्थना करा.'
एखादी गोष्ट तळमळीने केली, तर तिचे फळ निश्चित मिळते
सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली. आणि काय आश्चर्य...पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला! तात्पर्य हेच, स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली, तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा, की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी. तर ती खरी प्रार्थना! मागणे असे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर समष्टीचा अर्थात सर्व जीव सृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील, त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा!, असा उपदेश स्वामी समर्थ महाराजांनी केला.
।।श्री स्वामी समर्थ।।