Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमत्ताने लाखो भाविक महाराजांचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना मंत्रांचा जप करतात. विविध ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेतात. विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो. यानिमित्त शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन होते. टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमन जाते. यंदा गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन असल्याने हा दिवस विशेष मानला गेला आहे.
गजानन महाराज आणि साईबाबा महाराष्ट्रातील मोठी आणि तितकीच महत्त्वाची श्रद्धास्थाने. केवळ राज्यातील नाही, तर देश-विदेशातील भाविकही या दोन दिव्य विभूतींसमोर नतमस्तक होताना दिसतात. केवळ भारतात नाही, तर परदेशातही गजानन महाराजांचे मठ आहेत. गजानन महाराजांनी शेगावी, तर साईबाबांनी शिर्डी येथून कोट्यवधी भाविकांची गाऱ्हाणी दूर केली. गजानन महाराज आणि साईबाबा ही दोन निराळी शरीरे असली, तर ते आत्म्याने जोडले गेलेले होते, असे सांगितले जाते. गजानन महाराजांनी अवतार कार्याची सांगता केली, त्या प्रसंगावरून याची प्रत्यक्ष अनुभूती येते. गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या अनुयायांचे पत्र व्यवहार तसेच संवाद किंवा लेखन यातून ही बाब सिद्ध होत असल्याचेही सांगितले जाते.
साईबाबा शेगावच्या गजानन महाराजांना आपले गुरुबंधू मानत
गजानन महाराज आणि साईबाबा हे स्वामी समर्थांचे शिष्य असल्याचा उल्लेख स्वामी समर्थांशी निगडीत काही ग्रंथांत आल्याचे आढळून येते. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. साईबाबा योगारूढ पुरूष असून निराकार परमेश्वराचे साकार रूप होते. साईबाबा हे साधारणपणे १८३८ सालच्या दरम्यान शिर्डीत आले होते, असे म्हटले जाते. साईबाबा शेगावच्या गजानन महाराजांना आपले गुरुबंधू मानीत असत. कारण गजानन महाराज आणि साईबाबा हे दोघे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे दैवी शिष्य होते. या दोघांवर स्वामींनी अपार, असीम आणि अलौकिक कृपा केली. शिर्डीत घडलेल्या काही प्रसंगांवरून दोन्ही संत बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असेल तरी अंतरंगातून ते एकत्र मिसळलेले असतात, यात शंका नाही.
'बोलो गजानन महाराज की जय', असा जयजयकार केला
सन १९१० मधील सप्टेंबर महिन्यात गजानन महाराजांनी समाधी घेतली. इकडे शिर्डीत साईबाबांनी प्रातःकाळीच शूचिर्भूत होऊन बसले. ही घटना आपल्या दृष्टिकोनातून सामान्य असली, तरी साईभक्तांसाठी वेगळी होती. कारण साईबाबा साधारणतः दुपारनंतर आंघोळ करीत असत. त्या दिवशी मात्र त्यांनी केलेली ही कृती पाहून सेवेकरी अचंब्यात पडले. त्या दिवशी स्नान झाल्यानंतर त्यांनी एका भक्तास दुकानातून नारळ, थोडीशी साखर व भुईमूगाच्या शेंगा आणावयास सांगितल्या. आणलेला नारळ त्यांनी स्वतःच्या हाताने फोडला व त्याचे छोटे-छोटे तुकडे करून त्यासोबत साखर व भुईमूगाच्या शेंगा तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये वाटल्या. त्यानंतर त्यांनी 'बोलो गजानन महाराज की जय', असा जयजयकार केला.
अब आगेसे मेरे भाई साईबाबा आप लोगों की देखभाल करेंगे उनके पास शिर्डी चले जाना
यावेळी उपस्थित लोकांपैकी बऱ्याच जणांना गजानन महाराज यांच्याविषयी काही माहिती नव्हते. तरीही त्यांनी साईबाबांसोबत जयजयकार केला. नंतर श्रीसाईबाबांनी स्वतः त्या उपस्थित भक्तांना सांगितले की, आज सुबह मेरा भाई जाता रहा. इकडे खरोखरच सकाळी शेगावी गजानन महाराजांनी समाधी घेतली. तेव्हा शिर्डी येथे उपस्थित असलेल्या काकासाहेब दीक्षित यांना दोन दिवसानंतर गोपाळराव बुटी यांचे पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते की, गजानन महाराज समाधी घेतली व अंतिम समयी आम्हा शेगाव वासियांना आश्वासन दिले की, अब आगेसे मेरे भाई साईबाबा आप लोगों की देखभाल करेंगे उनके पास शिर्डी चले जाना.
गजानन महाराज आणि साईबाबा दोघेही परमात्म्याशी जोडले गेले होते
'श्रीगजानन विजय' या ग्रंथातील अभिप्रायमध्ये बा. ग. खापर्डे यांनी लिहिले आहे की, त्यांना त्याचे वडील दादासाहेब खापर्डे यांनी सांगितले होते की, गजानन महाराजांनी ज्या दिवशी देह ठेविला त्या दिवशी साईबाबा दिवसभर शोक करीत होते. ज्याक्षणी गजानन महाराजांचे महानिर्वाण झाले, त्यावेळी साईबाबा गडाबडा लोळले आणि माझा जीव चालला, मोठा जीव चालला, असा मोठा शोक केला. या दोन्ही संदर्भावरून असे लक्षात येते की, आंतरिक दृष्टीने या दोन्ही संतांची एकमेकांशी अतिशय जवळचा संपर्क होता. गजानन महाराज आणि साईबाबा दोघेही परमात्म्याशी जोडले गेले होते, असेच यावरून म्हणता येऊ शकेल, असे सांगितले जाते.