Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज, यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो. यंदा, २० फेब्रुवारी २०२५ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन येणे शुभ मानले गेले असून, या दिवशी केलेले श्री गुरुंचे नामस्मरण, आराधना, उपासना, मंत्रांचा जप, विशेष पूजन लाभदायक आणि पुण्य फलदायी मानले गेले आहे. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात. तसेच अनेक भाविक गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायणही करतात.
संत श्री दासगणू महाराज विरचित "श्री गजानन विजय ग्रंथ" हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. भक्तगण या ग्रंथाचे नित्यनेमाने पारायण, वाचन करतात. या ग्रंथांतील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती, आध्यात्मिक तत्त्वज्ञान, जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे. काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात. आणि जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात. मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यांमधली एक ओवी "कोठोनी आलो आपण । याचे करा हो चिंतन " आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान विशद करते. श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसे करावे? किती प्रकारे पारायण करता येते? जाणून घेऊया...
‘श्री गजानन विजय ग्रंथ’ पारायण करायचेय? पाहा, सोपी पद्धत
श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्य शाली ग्रंथ आहे. श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य “श्री गजाननविजय ग्रंथ” वाचनात आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट फळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन अन् एकदा तरी पारायण करा श्री गजाननविजय ग्रंथाचे, असे म्हटले जाते. श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे. जीवनातील विविध समस्या, अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते. श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध प्रकारे पारायण केले जाते.
- एकआसनी पारायण: एका दिवसात एकाच बैठकीत (न उठता) संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचन गतीनुसार पारायणासाठी ४ ते ५ तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे.
- एक दिवसीय पारायण: एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करता येू शकते. आजच्या धकाधकीच्या काळात एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात. ते एकदिवसीय पारायण. जागतिक पारायण दिनाला वरील दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे. वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो.
- तीन दिवसीय पारायण: तीन दिवस दररोज ७ अध्याय (किंवा ९, ७ व ५ अध्याय) वाचून हे पारायण केल्या जाते. दशमी, एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संतकवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे. मंदिरांमध्ये अथवा घरी असे पारायण आपण करू शकतो.
- सप्ताह पारायण: सात दिवस दररोज ३ अध्याय वाचून हे पारायण केल्या जाते. महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो.
- चक्री पारायण किंवा २१ दिवसीय पारायण: खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय वाचन करून २१ दिवसात हे पारायण करावे. साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा करतात. यात भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- सामूहिक पारायण: एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ (२१ अध्याय ) वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल.
- संकीर्तन पारायण: एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे, असे या संकीर्तनाचे स्वरूप असावे. ही एक श्रवण भक्ती आहे. गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की, त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे. ही सोपी गोष्ट नाही. व्यासपीठावर बसून जेव्हा ते मुखोद्गत पारायण करतात, त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगांचे निरुपण करतात, काही अनुभव सांगतात. हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळी-वेगळी पर्वणीच असते. असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण.
- गुरुवारचे पारायण: गुरूवार हा महाराजांचा शुभ दिन व २१ हा महाराजांचा शुभ अंक. २१ भक्तांचा गट तयार करून दर गुरूवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून २१ अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरूवारी एक पारायण व २१ गुरूवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते, असा द्विगुणीत लाभ मिळतो. एका गटात एकवीस भक्तच भाग घेऊ शकतात. हे गटाने करायचे पारायण असल्यामुळे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे. जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही.
|| श्री गजानन जय गजानन ||
|| गण गण गणात बोते ||