Swami Samarth And Shankar Maharaj: गुरुवार हा गुरुंचे नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. अक्कलकोटचे स्वामी महाराज आणि शंकर महाराज हे कोट्यवधी भाविकांचे आराध्य. दररोज न चुकता, नित्यनियमाने या दोन्ही गुरुंचे पूजन, नामस्मरण, उपासना, मंत्रांचे जप हजारो घरात केले जातात. शक्य असेल तेव्हा स्वामी मठात, मंदिरात, शंकर महाराजांच्या स्थानी जाऊन दर्शन घेतले जाते. अनेक जणांचा दर गुरुवारचा हा नित्यक्रम ठरलेला असतो.
स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. तर शंकर महाराज श्री शंकर महाराज योगीराज आहेत. ते कधी एका स्थानी नसत. त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत-नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. शंकर महाराज अलौकिक पुरुष होत, हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. माणसाला आपले आयुष्य नेहमीच सुखी, समृद्ध, वैभवाने भरलेले असावे, असे वाटते. यासाठी स्वामी महाराज आणि शंकर महाराज यांनी काही उपदेश केल्याचे पाहायला मिळते.
सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांची वचने
१. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
२. जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.
३. आळशी माणसाचे तोंडपाहू नये.
४. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा.
५. जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.
६. भिऊनकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.
७. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.
८. मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.
९. हम गया नही जिंदा है.
श्री शंकर महाराजांची मनोभूमिका
शंकर महाराज म्हणाले होते, मला काही कमी नाही, कारण मला कमावण्यासारखे काही नाही. आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही.
१) सुख-शांती हवी असेल, तर इच्छा, इर्षा, असुया, महत्त्वाकांक्षा, हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सतत अस्थिर होणारे मन स्थिर होईल.
२) सामाजिक-धार्मिक-नैतिक अधिष्ठान गुरुंमुळे प्राप्त होते. पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्य-नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरुस ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे.
३) गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा हवी.
४) जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात. त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो.
५) देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात. पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत. प्रथम आत्मबोध करावा तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल.
६) साधनमार्गात अपेक्षा आणि पूर्ती महत्त्वाची असते. पण त्यासाठी विश्वास व श्रद्धा हवी. विद्वत्तेने देवाला जोखू नये. विद्वान मंडळींना शंकाच फार येतात. त्यासाठी त्यांनी आपल्याच अंतरंगात डोकावून पाहावे. त्यायोगे शंका नाहीशा होऊन कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते.
७) स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे. त्यातूनच अपेक्षा वाढतात. स्वार्थासाठी मित्राला मदत, कीर्तीसाठी दानधर्म, कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की, लगेच राग येतो. तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो.
८) आशा, इच्छा, हव्यास, वित्त यांची हाव कधीच संपत नाही. मग त्यापोटी दु:ख-वेदना होणारच. बोटीतून प्रवास म्हटला की बोट हलणारच. मूल हवे तर प्रसूतीचा त्रास सोसलाच पाहिजे. शरीर म्हटले की व्याधी आलीच.
९) जे आत्मदर्शन प्राप्ती करुन घेतात त्यांना जन्म-मृत्यू नसतो. ते जगद्उद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात.
१०) सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ,
११) सद्गुणांची वाढ झाली तर माणसात देवत्व प्रकट होते.
१२) आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत. लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो. मनुष्य जन्म असेतोवरच हे समजून घ्या. आत्मकल्याण करुन घ्या. जीवनाचे सार्थक करा.’
।। श्री स्वामी समर्थ ।।
।। जय शंकर ।।