Gajanan Maharaj And Shree Swami Samarth Maharaj: श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत. त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. ‘गण गण गणात बोते’ हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करत असत, असे सांगितले जाते.
गजानन महाराज शेगावला येण्याअगोदर कुठे होते? ते कुठून आणि कसे आले? या संबंधीचे वर्णन दासगणूंनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथात नाही. तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी याबाबत काही माहिती लिहून ठेवल्याचे सांगितले जाते. श्री गजानन महाराज शेगावला येण्याअगोदर अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात होते व तिथे त्यांनी आपले बालपण घालविले. अक्कलकोट स्वामींजवळ एक दिवस बालअवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली, सिद्धपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशाप्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले व आपल्या समाधीची त्यांना जाणीव करून दिली, असे सांगितले जाते.
स्वामी समर्थांचे गजानन महाराजांना मार्गदर्शन
अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा.
स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की ही भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे, असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले.
महाराज त्याच्या डोक्यावरून आईच्या ममतेने हात फिरवून म्हणाले की, अरे तुझे जीवन पिंजऱ्यातल्या पोपटासारखे झाले आहे. तुझ्या अंतरी अजूनही षडरिपु पशु बनून राहिलेले आहेत त्यांना दूर कर. अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा. पुजारी गहिवरला आणि त्याने वरती पहिले तर तिथे कोणीच नव्हते. त्याने इकडे तिकडे बरेच शोधाशोध केली पण ती दिव्य विभूती त्याला काही भेटली नाही. पण आता तो अंतर्बाह्य शुद्ध झाला होता.
|| गण गण गणात बोते ||
|| श्री गजानन जय गजानन ||
|| श्री स्वामी समर्थ ||