Shree Swami Samarth Smaran Din April 2025: संपूर्ण चैत्र महिन्याभर स्वामी कृपेचा वर्षाव होत असतो, असे म्हटले जाते. कारण चैत्र शुद्ध द्वितीयेला ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो, तर चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन असतो. म्हणजेच चैत्र वद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. यंदा, ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तसेच २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतारकार्य समाप्तीचा दिवस आहे. गुरुवार, २४ एप्रिल २०२५ ते २६ एप्रिल २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत स्वामी समर्थांची विशेष सेवा करता येऊ शकेल.
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. स्वामी महाराजांनी आपल्या अवतारकार्यात अनेक लीला केल्या. अनेकांचा उद्धार केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. दांभिकता, अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही. अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे.
३ दिवस स्वामी सेवा कशी करावी?
गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल. अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. आपल्या मनातील इच्छा, भाव सांगावा. नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे, हे मनाशी पक्के करावे. ही सेवा ही सुरुवात आहे, असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी. अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल, तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे.
स्वामी चरित्र सारामृत, गुरुलीलामृताचे पारायण
शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत याचे पद्धतीने पारायण करावे. तसा संकल्प करावा. या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. पण एकदा संकल्प केला की, त्यात खंड पडू देऊ नये.
‘या’ गोष्टी आवर्जून कराव्यात
स्वामींची सेवा मनापासून करावी. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करावा. तसेच स्वामींना पिवळ्या रंगांचे पेढे अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून वाटावेत. तसेच नैवेद्य दाखवताना स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. स्वामी महाराजांच्या स्मरण दिनी शक्य असेल, त्या गोष्टींचे दान करा. यामध्ये पिवळ्या रंगांच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम. शक्य असेल गुरुवारपासून ते स्मरण दिनापर्यंत सलग तीन दिवस या गोष्टी कराव्यात. तीन दिवस शक्य नसेल, तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरण दिनी आवर्जून या गोष्टी कराव्यात.
‘हे’ कायम लक्षात ठेवाच
- आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात.
- अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवे.
- मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये.
- एकदा संकल्प केला की, तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे.
- शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी.
- स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥