Shree Swami Samarth: माणूस काही ना काही ध्येय घेऊन पुढे जात असतो. मेहनत, परिश्रम आणि कष्ट या जोरावर यश-प्रगती साध्य करत असतो. मात्र, अनेकांना यश आणि प्रगती पचवणे कठीण होते. अशावेळी कळत-नकळतपणे अहंकार येत जातो. कालांतराने याच अहंकाराची किंमत मोजावी लागते, असे म्हटले जाते. ब्रह्मांडनायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोट्यवधी भक्त दररोज भजत-पूजत असतात. काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक अनुभव भाविकांना आल्याचेही पाहायला मिळते. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीने पुढे जाण्याची शिकवण एका कथेतून मिळते.
भक्ती निरपेक्ष असावी. गुरुचा आशिर्वाद पाठिशी असणाऱ्यांना कसलेच भय राहत नाही. मेहनत, सातत्य, जिद्द, परिश्रम, सत्कर्म करत यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो. मात्र, यश आणि प्रगतीचे वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोहोचले की, गर्व होतो. मग याचा पुढचा टप्पा म्हणजे अहंकार. माणूस एकदा अहंकारी झाला की, त्याला दुसरे चांगले काहीच दिसत नाही. कितीही ज्ञान पदरात पडले, तरी अहंकारी माणूस अधोगतीच्या मार्गाला लागतो. स्वामी समर्थ महाराज नृसिंह सरस्वतींचे अवतार आहेत, हे रामदासी बुवांना फारसे पटत नसे. रामदासी बुवा एका मठाचे महंत. ते प्रचंड ज्ञानी, विद्वान असतात. परंतु, अहंकारी आणि फार गर्विष्ठ असतात. वेद शास्त्रार्थात भल्याभल्या विद्वांनांना ते चीतपट करत. एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला की, त्याला दंड किंवा शिक्षा म्हणून आपले पायताण डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे.
महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात
एक दिवस स्वामी तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात. महंतांच्या मठात जागा नसते. म्हणून ध्यान कक्षात केवळ एका तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात. बरोब्बर एका तासानी महंत येतात. स्वामींना उठवतात. परंतु, स्वामी काही उठत नाहीत. अनेकदा आणि बराच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाहीत. यामुळे स्वामींना धडा शिकवावा, असे महतांच्या मनात येते. महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात.
स्वामी चैतन्य स्वरुप, कोणीही डांबून ठेऊ शकत नाहीत
स्वामी महंतांच्या मठात आले आहेत, अशी वार्ता कळल्यावर स्वामींचे भक्त असलेले तेथील एक शास्त्री स्वामीदर्शनासाठी येतात. महंत त्यांना सांगतात की, स्वामींना खोलीत डांबून ठेवले आहे. शास्त्री चपापतात आणि महंतांना म्हणतात की, स्वामी चैतन्य स्वरुप आहेत. कोणीही डांबून ठेऊ शकत नाहीत. मात्र, शास्त्रीबुवांच्या म्हणण्याला महंत फारशी किंमत देत नाहीत. शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनानी बसून राहतात. थोड्यावेळाने ते तेथून बाहेर पडतात.
स्वामी सूर्याला अर्घ्य देत असतात
परिसरात फिरत असताना ते एका सरोवरापाशी येतात आणि पाहतात ते काय, स्वामी सूर्याला अर्घ्य देत असतात. तेवढ्यात महंत रामदासी बुवाही तेथे पोहोचतात. स्वामींना पाहून महंत अगदी थबकतात. स्वामी बाहेर येतात. महंत आणि शास्त्रीबुवांबरोबर पुन्हा मठात येतात. महंत खोलीचे दार उघडतात, तर तिथे स्वामी दिसतात. दुसरीकडे, त्यांचासोबत स्वामी उभे असल्याचे ते पाहतात. एकाच ठिकाणी स्वामींची दोन रुपे पाहून ते अवाक होतात. काही काळ नेमके काय करावे आणि काय बोलावे, हेच त्यांना कळत नाही.
अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे
शेवटी ते स्वामींचे पाय धरतात. स्वामींना शरण जातात. स्वामी म्हणतात, बुवा, तुम्ही ज्ञानी आहात, विद्वान आहात. अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखेत मिळवतो. प्रचंड माहिती असूनही अहंकारामुळे प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही. ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते. कारण ज्ञानात अपेक्षा असते. मात्र, भक्ती निरपेक्ष असते. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीच्या मार्गावर पुढे गेलात, तर यशोशिखरावर नक्कीच पोहोचाल, अशी शिकवण स्वामी देतात. स्वामी वचनांनी महंत बुवांना चूक उमगते.
|| श्री स्वामी समर्थ||