Shreedhar Swami Punyatithi 2025: महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. अनेक संत, महंत आणि अध्यात्मिक अधिकार असणाऱ्या अनेक थोर व्यक्तींनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे श्रीधर स्वामी महाराज. १५ एप्रिल २०२५ रोजी श्रीधर स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने श्रीधर स्वामी महाराजांच्या दिव्य चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा...
७ डिसेंबर १९०८ रोजी दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी लाड-चिंचोळी येथे स्वामीजींचा जन्म झाला. हे गाव गाणगापूरपासून नऊ मैलावर आहे. मुलाचे नांव श्रीधर असे ठेवण्यात आले. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडील व बाराव्या वर्षी आईला देवाज्ञा झाली. लहानपणापासूनच श्रीधर स्वामींना कथा कीर्तने ऐकण्याची गोडी लागली होती. तसेच रामनामाने हुकमी यश मिळते, असाही त्यांना अनुभव आला होता. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कीर्तन श्रवण व व्यायाम अशा गोष्टींची रुची श्रीधर स्वामींना होती. हैदराबाद व गुलबर्गा येथे नातेवाईकांकडे राहून यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुरे केले व माध्यमिक शिक्षणासाठी हे पुण्याला गेले. श्रुतिस्मृतिपुराणोक्त समाजाच्या उभारणीनेच भारताला पूर्ववत वैभव प्राप्त होईल, अशी यांची श्रद्धा होती. तेव्हा सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी आपले जीवन समर्पित करावे, असे स्वामींनी ठरवले. त्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रात अधिकार मिळवावा, असे स्वामींच्या मनाने घेतले.
प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामींनी दिले दर्शन
आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी योग्य अशा गुरूची कास धरावी लागते. त्याप्रमाणे उग्र तपश्चर्याही करावी लागते हे यांना माहिती होते. म्हणून यांनी एका विजयादशमीला सज्जनगडावर तपस्येसाठी जाण्याचा निर्णय घेतला. ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत त्यांनी समर्थांच्या समाधीचे व श्रीराम प्रभूंच्या मूर्तींचे दर्शन घेतले आणि गडावर श्रीधरबुवा रामदासी म्हणून राहू लागले. सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली. साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेला विलक्षण महत्त्व आहे. कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला. कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा प. पू. भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली. जप, तप, सेवा, अभ्यास, दासबोध वाचन, करूणाष्टके पठण असा त्यांचा नित्याचा परिपाठ असे. १९३० च्या दासनवमीच्या दिवशी श्रीधरांना प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामींनी दर्शन दिले. श्रीधरांना या काळातच विदेह अवस्था प्राप्त झाली.
आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी दर्शन दिले
समर्थ रामदास स्वामींच्या आज्ञेने गडाच्या दक्षिणेच्या बाजूने उतरून, जंगलातून गोकर्ण-महाबळेश्वरला गेले. त्याठिकाणी शिवानंद योगी व स्वामींची भेट झाली. अतूट नाते निर्माण झाले. पुढे ते शिवानंदांच्या आश्रमात कर्नाटकात शिगेहळ्ळीला राहिले. तेथे तप, साधना केली. असेच पुढे जाता जाता कोडसाद्री या पर्वतावर श्रीधर तप करीत असता त्यांना आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी दर्शन दिले. त्यांना ब्रह्मासनावर बसविले. तेथे रिद्धिसिद्धी योगिनी, शक्तिदेवता प्रकट झाल्या व सांगितले की, आपल्या धर्मकार्यासाठी आमचे आशिर्वाद व सहाय्य राहील. सन १९३५ चे सुमारास ते पुन्हा गडावर आले. त्यांचे हातून रामगौरव, श्रीरामपाठ, श्रीसमर्थपाठ, मारूति माहात्म्य, स्वात्मनिरूपण हे साहित्य निर्माण झाले. कानडी, इंग्रजी, संस्कृत व मराठी भाषेतून तत्वज्ञानपर चिंतन त्यांनी ग्रंथरूपाने लिहिले. स्वामीजींनी संन्यास धारण केल्यानंतर एकंदर ३२ वर्षे सतत धर्मप्रचाराचे कार्य केले.
संपूर्ण भारतभ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार
मधल्या कालखंडात समर्थ संप्रदायाला एक प्रकारची ग्लानी व औदासीन्य आले होते. समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड त्याचप्रमाणे चाफळ, शिवथरघळ, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामींनी संपूर्ण भारतभ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. असंख्य भक्त महाराष्ट्रात त्याचप्रमाणे कर्नाटकात व काही प्रमाणात भारतभर पसरले आहेत. त्यांनी सज्जनगड, शिवथरघळ, चाफळ या ठिकाणांचा प्रचंड विकास घडवून आणला. त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्यांनी गडावर श्री. समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या संस्थेची स्थापन १९५० साली केली. श्री समर्थ सेवामंडळाच्या प्रत्येक कार्याला स्वामींचा सदैव आशीर्वाद असे. स्वामींनी गडावरच्या सर्व ऐतिहासिक वास्तूंची उत्तम डागडुजी करून घेतली आणि गडावर येणाऱ्या समर्थ भक्तांची सोय लक्षात घेऊन गडावर मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा घडवूनन आणल्या. इतके असूनही श्रीधर स्वामींना एकांतवास प्रिय असे. त्यांनी एकूण १३ वर्षे एकांतवास केला होता. स्वामीजींनी प्रत्येक चातुर्मास एकांतपूर्ण अनुष्ठान करुन गुरूकृपेचा स्वानंद अनुभवला व जीवनातील अखेरची दहा वर्षे वरदपूर आश्रमातच एकांतातच व्यतीत केली. अशा या श्रीधरस्वामींनी १९६७ साली पुन्हा एकांत साधना सुरू केली. चैत्र वद्य व्दितीयेला १९ एप्रिल १९७३ रोजी सकाळी ओंकाराचा तीन वेळा उच्चार करून श्रीधर स्वामी समाधीस्त झाले.