>> राजेश शेगोकार
शेगाव या गावाची ओळख गजानन महाराजांचे गाव विदर्भाची पंढरी अशी आता झाली आहे. गजानन महाराजांमुळे या गावाचे भाग्यच बदलले; मात्र शेगावात गजानन महाराज प्रकट झाले त्या दिवशी त्यांचे नाव काय, ते कुठून आले, याची माहिती कुणालाच नव्हती. मग त्यांना गजानन हे नाव कसे पडले, याची कथा श्री दासगणू महाराजांनी ‘गजानन विजय’ ग्रंथात नमूद केली आहे.
माघ वद्य सप्तमी या दिवशी बंकटलालांना गजानन महाराजांचे शेगावात प्रथम दर्शन झाले. उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचण्याचा तो प्रसंग आपणा सर्वांना माहीतच आहे. त्या प्रसंगानंतर गजानन महाराज हे शेगावातून निघून गेले. ते कुठे गेले म्हणून बंकटलाल चिंताग्रस्त झाले. त्यांना गजानन महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली. त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते. त्यांनी शेगावच्या पंचक्रोशीत गजानन महाराजांचा शोध घेतला; परंतु महाराजांचा कुठेही ठावठिकाणा दिसला नाही. अशात तीन-चार दिवस निघून गेले. यांच्या वडिलांनीही बंकटलालाला चिंतेचे कारण विचारले. बंकटलालाने त्यांना काही नाही असे सांगितले; मात्र गजाननाच्या दर्शनाची अस्वस्थता ते लपवू शकले नाहीत. त्यांच्या शेजारी असलेले रामजीपंत देशमुख यांना जेव्हा बंकटलाल यांनी मनातील अस्वस्थता, श्रींच्या दर्शनाची ओढ सांगितली तेव्हा रामजीपंतांनाही बंकटलाल यांना कुठल्या तरी सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले याची खातरजमा झाली.
त्या दिवशी शेगावच्या महादेव मंदिरामध्ये गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन होते. गोविंदबुवा हे वऱ्हाडातील प्रख्यात कीर्तनकार, अध्यात्माचे मोठे अधिकारी पुरुष. त्यांच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील भाविक येत असत. त्यांचे कीर्तन शेगावात आहे म्हटल्यावर बंकटलालाही त्यांच्या कीर्तनाला निघाले. रस्त्यात त्यांना पितांबर शिंपी भेटले. बंकटलाल यांनी पितांबर यांच्याजवळ महाराजांच्या दर्शनाची ओढ आणि मनातील अस्वस्थता प्रकट केली. दोघेही बोलत महादेव मंदिरामध्ये पोहोचले. तेथे गेल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, कारण महादेवाच्या मंदिराच्या समोर प्रत्यक्ष गजानन महाराज बसलेले दिसले. बंकटलालांना मोठा हर्ष झाला. त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला. विचारपूस केली, जेवायचे का म्हणून विचारले. महाराजांनी शेजारच्या घरात जाऊन झुणका-भाकर घेऊन ये असे सांगितले. बंकटलालने त्वरेने झुणका-भाकर आणून महाराजांना दिली. महाराजांनी पोटभर जेवण केले आणि रिकामा तांब्या पितांबराच्या हाती देत बाजूच्या ओढ्यामधील पाणी घेऊन ये, असे सांगितले. ओढ्याचे पाणी गढूळ आहे, पिण्यायोग्य नाही, ओंजळीने पाणी भरावे लागेल, मी दुसरे पाणी आणतो, असे पितांबराने सांगितले; परंतु महाराजांनी नकार दिला. ते म्हणाले की, ओढ्याचे पाणी घेऊन ये आणि ओंजळीने पाणी भरू नको. महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवत पितांबर ओढ्याजवळ पोहोचले. ओढ्यात ओंजळीने पाणी घेता येईल एवढेही पाणी नव्हते; मात्र महाराजांची आज्ञा पळत त्यांनी ओढ्यात तांब्या बुडवला आणि ओढ्याला खड्डा पडला. त्यामध्ये स्वच्छ पाणी दिसले. पितांबराने तांब्या भरला अन् गजानन महाराजांना पाणी दिले. महाराजांनी पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर दिला आणि सांगितले, जा कीर्तन ऐका. मी इथेच बसतो.
"मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका ।"
…अन् गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरची शितं खाल्ली!
तिकडे गोविंदबुवांनी कीर्तन सुरू केले होते. निरुपणासाठी भागवतामधील एक श्लोक घेतला होता. त्याचा पूर्वार्ध संपत आला. क्षणभर गोविंदबुवांनी उसंत घेतली आणि तेवढ्यात त्या अभंगाचा उत्तरार्ध महाराजांनी सांगण्यास सुरुवात केली. मंदिराच्या बाहेरून येणारा आवाज ऐकल्याने सर्व भाविक आश्चर्यचकित झाले. हा कोण सिद्धपुरुष बाहेर बसलाय म्हणून त्यांच्यापर्यंत सगळ्यांनी धाव घेतली. त्यांनी महाराजांना मंदिरात येण्याची विनंती केली; परंतु महाराज आले नाहीत. अखेर गोविंदबुवा मंदिराच्या बाहेर आले आणि महाराजांना म्हणाले, तुम्ही मंदिरात चला. तुमच्याशिवाय कीर्तन अपूर्ण आहे. महाराजांनी त्यांना उपदेश दिला आणि सांगितले, जा कीर्तन पूर्ण करा, येथेच बसतो.
या प्रसंगानंतर गजानन महाराज कुणीतरी सिद्धपुरुष आहेत, याची ख्याती शेगावच्या पंचक्रोशीत पोहोचली. कीर्तनानंतर बंकटलालाने महाराजांना घरी नेले. महाराज तिथेच वास्तव्य करू लागले. महाराज दिवसभर एक भजन गुणगुणत असत. ते भजन होते ‘गण गण गणात बोते’ महाराज सातत्याने हे भजन गुणगुणत असल्यामुळे भाविकांनी त्यांना गजानन नावाने संबोधण्यास सुरुवात केली.
श्री दासगणू महाराजांनीसुद्धा विजय ग्रंथात ते नमूद केले आहे.
गण गण हे त्यांचे भजनहमेशा चाले म्हणूनलोकांनी दिले अभिज्ञानगजानन हे तयाला
आणि अशा रीतीने शेगावात परतलेल्या सिद्धपुरुषाला गजानन महाराज या नावाने भाविक मोठ्या भक्तीने पूजू लागले. कीर्तनानंतर गोविंदबुवा म्हणाले होते, ‘हे न शेगाव राहिले, पंढरपूर झाले खचीत...’ आज त्याचे प्रत्यंतर येते.