Shri Krishna Janmashtami 2024: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥... बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. २६ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. जन्माष्टमीचा उत्सव देशभरात साजरा केला जातो.
महाभारताचा काळ लोटून हजारो वर्षे उलटून गेली, तरी त्याकाळातील अनेक रहस्ये आजच्या काळातही अचंबित करणारी अशीच आहे. इतकी वर्षे लोटूनही त्याबाबतची जिज्ञासा कमी झालेली दिसत नाही. आजपर्यंत अनेकांनी महाभारतावर अभ्यास केला. अनेक गोष्टींचे बारकाईने संशोधन केले, तरीदेखील महाभारत पूर्णपणे असे म्हणता येईलच असे नाही. महाभारताचे युद्ध तब्बल १८ दिवस सुरू होते. हजारो पराक्रमी योद्धे यात मारले गेले. अर्जुनाला आप्तेष्टांवरच शस्त्र उचलणे शक्य होत नव्हते. अशावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले ज्ञान भगवद्गीता म्हणून ब्रह्मांडाला लाभले. श्रीकृष्णाने कोणतेही शस्त्र न उचलता कुटनीती, राजकारण, मुसद्देगिरी यांच्या जोरावर पांडवांना या युद्धात विजयी बनवले. पांडवांनीही आपला अतुल्य पराक्रम रणांगणावर गाजवला. श्रीकृष्णाने बालपणापासून अनेक लीला केल्या. त्यातील ही लीला ऐकल्यावर आपणही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. महाभारत युद्ध भूमीवर श्रीकृष्ण दररोज न चुकता शेंगदाणे खात असे, असे सांगितले जाते. यामागे काय होते ते रहस्य? जाणून घेऊया...
उडुपीच्या राजावर श्रीकृष्णाने दिली मोठी जबाबदारी
पौराणिक कथेनुसार, महाभारत युद्धाची घोषणा झाली, तेव्हा कौरवांनी अनेक राजांना आपल्याबाजून वळवून घेण्यास सुरुवात केली. पांडवांनीही अनेकांना त्यांच्याबाजूने लढण्याची विनंती केली. हे युद्ध धर्म आणि अधर्माच्या तत्त्वामुळे सुरू झाले. काही राजांनी कौरवांना साथ दिली, तर काही राजांनी आपले सर्व सैनबळ पांडवांच्या पाठिशी ठामपणे उभे केले. या सर्व घडामोडीत श्रीकृष्णाची नीती होतीच. महाभारत युद्धात सहभागी न होणारे राज्य म्हणजे उडुपी. उडुपीचा राजा श्रीकृष्णाकडे आला आणि नम्रतेने म्हणाला की, धर्म-अधर्माच्या युद्धात कोट्यवधी योद्धे, पराक्रमी पुरुष सहभागी होत आहेत. मात्र, या युद्धात प्रत्यक्ष सहभागी न होता या युद्धातील वीरांची भोजनाची जबाबदारी घ्यायला मला आवडेल. त्यामुळे आपली आज्ञा असेल, तर मी कार्य अगदी योग्य पद्धतीने पार पाडेन. युद्धात सहभागी असलेल्या सर्वांना पुरेसे भोजन देण्याची मी व्यवस्था करेन.
श्रीकृष्णाची क्लृप्ति आणि उडुपीचा राजा झाला नतमस्तक
उडुपीच्या राजाचे हे औदार्य पाहून श्रीकृष्णांना आनंद झाला. त्यांनी लगेच त्यांना परवानगी दिली. मात्र, एक सर्वांत मोठा प्रश्न राजासमोर होता. तो म्हणजे नेमक्या किती सैनिकांसाठी दररोज जेवण करायचे? दररोज किती योद्धांना वीरगती प्राप्त होणार आणि किती जणांच्या भोजनाची करावी लागणार, याबद्दल कुणालाच माहिती नव्हते. भोजन कमी पडले, तर सैनिकांना उपाशी राहावे लागेल आणि प्रमाणापेक्षा अधिक व्यवस्था केली, भोजन उरले तर अन्नपूर्णा देवीचा अपमान होईल. या द्विधा मनःस्थितीत राजा होता. श्रीकृष्णांना राजाची अवस्था समजली. त्यांनी त्यातून एक मार्ग सूचवला. त्यांनी एक रहस्य उडुपीच्या राजाला सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले की, मी युद्ध सुरू व्हायच्या दररोज उकडलेले शेंगदाणे खाईन. मी जेवढे शेंगदाणे दररोज सकाळी खाईन, तेवढ्या सैनिकांना, पराक्रमी योद्धांना वीरगती प्राप्त होईल. या माध्यमातून आपल्याला नेमके किती जणांचे भोजन तयार करावयाचे आहे, त्याची व्यवस्था लावता येईल. हे रहस्य ऐकून उडुपीचा राजा श्रीकृष्णांसमोर नतमस्तक झाला आणि पुढील कामाला लागला.
श्रीकृष्णाची अट अन् हजारो सैनिकांना पुरेसे भोजन
श्रीकृष्णांनी सांगितलेले रहस्य ऐकून उडुपीचा राजा अचंबित झाला. मात्र, हे रहस्य अगदी कुणालाही सांगायचे नाही, अशी अट श्रीकृष्णांनी राजाला घातली होती. श्रीकृष्णांच्या आदेशाची अवज्ञा उडुपीच्या राजाने कधीही केली नाही. महाभारताचे युद्ध सुरू असेपर्यंत दररोज अगदी न चुकता उडुपीच्या राजाने सर्व सैनिकांना, योद्धांना पुरेसे भोजन पुरवले. यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने जेवणही मिळाले आणि अन्नपूर्णा देवीचा अपमानही झाला नाही. उडुपीच्या राजाची चिंता मिटली.