Shri Krishna Janmashtami On Shravan Somvar 2024: संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी. देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव, जन्म सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. यंदा २०२४ मध्ये २६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे. यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे. जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार, अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जातात. या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे. कोणता उपास कधी आणि कशा प्रकारे सोडावा, हे जाणून घेऊया...
गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे. याच दिवशी श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारीही उपवास केला जातो. अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो. परंतु, श्रावणी सोमवारचा उपवास सोडला, तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल. त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की, जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल, तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा?
जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा?
काही शास्त्रांनुसार, श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हींचे उपवास धरले असतील, तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवघ्राण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल. परंतु, ही पद्धत योग्य नाही. कारण ही पद्धत अवलंबली, तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे, याची योजना शास्त्रांत केलेली आढळून येते.
एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल, तर पाण्याने पारणे करावे, असे सांगितले जाते. कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो. ‘आपो वा अशितं अनशितं च|’, कारण पाणी जे असते, ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते, असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे, त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा. म्हणजेच तशी भावना मनात करायची असते. पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की, मी सोमवारचा उपवास सोडतो. म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील, असे सांगितले जात आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.