Ram Navami 2023: मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण. श्रीविष्णूंनी सातवा अवतार श्रीरामांच्या रुपात घेतला, हे सर्वश्रुत आहे. प्रत्यक्ष परमेश्वरालाही मानवी जन्म घेतल्यावर सर्व भोग भोगावे लागतात, हेच यातून दिसते. संपूर्ण जीवन झिजवले, तरी राम समजला, असे म्हणता येईलच असे नाही. प्रभू श्रीराम संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. यंदा सन २०२३ मध्ये ३० मार्च रोजी श्रीराम नवमी आहे. याच दिवशी चैत्री नवरात्राची सांगता होणार आहे. यावर्षी साजऱ्या होत असलेल्या श्रीराम नवमीला गुरुपुष्यामृत योगासह ५ अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत.
चैत्री नवरात्राची सांगता होताना श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीराम नवमी देशभरात साजरी केली जाते. यंदाच्या श्रीरामनवमीला ५ अत्यंत शुभ योग जुळून आले आहेत. श्रीराम नवमीच्या दिवशी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. प्रभू श्रीरामाच्या कुंडलीतही चंद्र कर्क राशीत विराजमान आहे. याशिवाय श्रीरामनवमीच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग असे ५ शुभ योग जुळून आले आहेत. या शुभ योगांमध्ये प्रभू श्रीरामांचे पूजन करणे अत्यंत फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सोप्या पद्धतीने प्रभू श्रीरामांचे पूजन कसे करावे? जाणून घ्या...
‘असे’ करा श्रीरामांचे पूजन, इच्छापूर्ती होईल!
बुधवार, २९ मार्च २०२३ रोजी रात्रौ ९ वाजून ०६ मिनिटांनी चैत्र शुद्ध नवमी सुरू होत आहे. तर गुरुवार, ३० मार्च २०२३ रोजी रात्रौ ११ वाजून २९ मिनिटांनी नवमी समाप्त होईल. भारतीय संस्कृतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे श्रीरामांचे पूजन ३० मार्च रोजी करावे, असे सांगितले जात आहे. ३० मार्च रोजी गुरुपुष्यामृत योग रात्री १०.५८ पासून सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३६ पर्यंत हा योग असेल. श्रीरामांचे पूजन करण्यासाठी सकाळी लवकर उठावे. स्नानादी कार्ये उरकून घ्यावीत. एका चौरंगावर श्रीरामांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी. श्रीरामांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. श्रीरामांची आरती म्हणावी. श्रीरामांना आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावून रामचरितमानस पठण करावे. रामचरितमानस शक्य नसेल तर सुंदरकांडाचे पठण करावे. असे केल्याने घरात सुख, समृद्धी, धन-वैभव येऊन इच्छापूर्ती होऊ शकते. तसेच या दिवशी ॐ श्रीं ह्रीं क्लीं रामचन्द्राय श्री नम: या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
लक्षात ठेवा की, भगवान श्रीरामाच्या पूजेबरोबरच माता सीतेचीही पूजा करावी. पूजेच्या शेवटी, श्रीराम आणि माता सीता यांचे आशीर्वाद घ्यावे. यानंतर पूजेतील जल घेऊन घरात शिंपडावे. असे केल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"