Shriram Navami 2025 Janmotsav At Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अलीकडेच झालेल्या महाकुंभमेळ्यात सुमारे ६६ कोटी भाविक सहभागी झाले होते. यापैकी सुमारे साडेचार कोटी भाविकांनी अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेतले. यानंतरही अयोध्येत जाणाऱ्या भाविकांचा ओघ कमी होताना दिसत नाही. अयोध्येतील भव्य राम मंदिराचे लोकार्पण होऊन एक वर्षांहून अधिक काळ झाला असून, इतक्या कमी कालावधीत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची आणि मिळणाऱ्या दानाची आकडेवारी लक्षणीय आहे. अल्पावधीतच देशातील सर्वोत्तम सर्वोच्च टॉप १० मंदिरांच्या यादीत राम मंदिराने स्थान पटकावले. राम मंदिरात श्रीराम नवमीला रामललाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार असून, याची सविस्तर माहिती श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टने जारी केली आहे.
गेल्या वर्षी राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर प्रथमच श्रीराम नवमीला रामललाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता. आता यंदा २०२५ रोजी राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी राम मंदिर प्रशासन जय्यत तयारीला लागले असून, संपूर्ण दिवस राम मंदिरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. २०२५ मध्ये ६ एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टने एक कार्यक्रम जारी केला आहे. या दिवशी सकाळी ९.३० वाजता रामललाचा अभिषेक केला जाईल. यानंतर, दुपारी १२ वाजता रामललावर सूर्य तिलकाने अभिषेक होणार आहे.
श्रीराम नवमीला अयोध्येतील राम मंदिरात जन्मोत्सवाचे असे असेल वेळापत्रक
ट्रस्टने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच श्रीराम नवमी ६ एप्रिल रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी ९.३० वाजता धार्मिक विधी सुरू होतील. भगवान श्री रामललाचा अभिषेक सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत होईल. सकाळी १०.३० ते १०.४० पर्यंत १० मिनिटे दर्शन बंद असेल. यानंतर, सकाळी १०.४० ते ११.४५ पर्यंत रामललाला आरास केली जाईल. सकाळी ११.४५ वाजता नैवेद्य दाखवला जाईल. दुपारी १२ वाजता रामललाची आरती केली जाईल. याच वेळी ४ मिनिटे रामललावर ४ मिनिटे सूर्य तिलक अभिषेक होईल. राम मंदिरात वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस पठण केले जाईल. याशिवाय, दुर्गा सप्तशतीच्या १ लाख मंत्रांची आहुती दिली जाईल.
श्रीराम जन्मोत्सवासाठी राम मंदिरात ५० लाख भाविक येण्याचा अंदाज
यंदा २०२५ला होणाऱ्या श्रीराम जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी सुमारे ५० लाख भाविक अयोध्येत येऊ शकतात, असा कयास असून, त्यादृष्टिकोनातून राम मंदिर प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. अयोध्येत ३० मार्चपासून रामनवमीचा मेळा सुरू होत आहे. ६ एप्रिल रोजी नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. राम मंदिर आणि कनक भवनसह ५००० मंदिरांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. याबाबत मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही दशरथ महाल, करुणा निधान भवन, विभूती भवन, राम हर्षण कुंज, जानकी महाल, मणि रामदास छावणी, बडा भक्त महाल, हनुमान बाग, चारुशीला मंदिर यासह अनेक मंदिरांमध्ये धार्मिक विधी होणार आहेत.
दरम्यान, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व्यवस्था केली जात आहे. हरिधाम पीठाचे महंत जगद्गुरू रामदिनेशाचार्यांनी सांगितले की, रामनवमीनिमित्त अयोध्येतील सर्व मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रामकथांचे आयोजन केले जात आहे. १० दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. रामलीला आयोजित केली जात आहे. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. या कार्यक्रमांमध्ये देशभरातील लोक सहभागी होतील. रामनवमीला मोठ्या संख्येने लोक अयोध्येत पोहोचतील. सर्व मंदिरांमध्ये व्यवस्था केली जात आहे. सर्व संत, पुजारी आणि महंत, त्यांच्या शिष्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. बडा भक्तमाळचे महंत अवधेश दास म्हणाले की, मठ आणि मंदिरांमध्ये भाविकांना राहण्याची व्यवस्था आहे. आमच्या मठाशी संबंधित असलेल्या लोकांनाच येथे स्थान दिले जाईल. दरवर्षी ते मठात राहतात आणि धार्मिक विधी करतात.