Shripad Shri Vallabh And Swami Samarth Maharaj: या कलयुगात भक्ताचा उध्दार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रम्हा, विष्णु, शिव या त्रिमूर्तीनी श्री दत्तात्रय याचा अवतार घेतला. ब्रम्हदेव 'चंद्र' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. श्रीदत्तगुरुंचे पुढे तीन अवतार झाले. प्रथम श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, द्वितीय श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज हे तिन्ही अवतार श्रीगुरू दत्तात्रेय यांचेच आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ आणि स्वामी यांनी भाविकांसाठी कालातीत आशीर्वचन दिले असून, आजही त्याची प्रचिती येत असल्याची अनेक भाविकांची भावना असल्याचे सांगितले जाते.
श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी पीठापुरम येथे १६ वर्षे तर कुरवपूर येथे १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत लीला दाखवून इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत-सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दृष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत-पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदि अनेक गोष्टींचा संदेश दिला.
श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचा बालस्वरुपातील अवतार आहे. तर स्वामी समर्थ महाराज हे तिसरे अवतार आहेत. एखाद्या आजोबांनी नातवांवर जसे प्रेम करावे, तसे स्वामी भाविकांवर मायेने कृपा करीत, असे सांगितले जाते. स्वामी समर्थ महाराजांनीही अनेक अद्भूत लीला करून भक्तांचा उद्धार केला. आजमितीला स्वामींचे अनेक ठिकाणी मठ असून, भाविक नित्यनेमाने स्वामींचे दर्शन घेतात. स्वामींना आपल्या समस्या, अडचणी सांगतात. स्वामींची कृपा व्हावी, यासाठी स्वामी सेवेच्या माध्यमातून प्रयत्नशील असतात. स्वामी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे अनुभव अनेक भाविक सांगतात. श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आणि स्वामी महाराजांनी भाविकांना अभय वचने दिली आहेत.
श्रीपादांची भक्तांना सांगितलेली अभय वचने
- माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.
- मन, वाचा आणि काया-कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो.
- श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे.
- सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
- अन्नासाठी व्याकुळलेल्यांना जेवायला दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.
- मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
- तुमचे अंत:करण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.
- तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल.
- तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह/आशिर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो.
- श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही. सकल देवता स्वरूप समस्त शक्तिचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल.
- श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी, महासिद्धपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.
- तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा, कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो.
स्वामी समर्थांची वचने
- भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
- जो माझी अनन्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वत: वाहतो.
- आळशी माणसाचे तोंड पाहू नये.
- शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा.
- जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.
- भिऊ नकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.
- आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.
- मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.
- हम गया नही जिंदा है.
|| दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ||
|| श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||