श्रीराम राम रघुनन्दन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम॥लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्। कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये॥
Shriram Aakhyan: प्रभू श्रीराम जेवढे मर्यादा पुरुषोत्तम होते, शांत-संयमी-धैर्यशील होते, तितकेच ते राक्षसांचा वध करणारे रणझुंजार, दुर्जनांचे कर्दनकाळ होते. गुरुकुलात जाऊन केवळ धर्म आणि शास्त्राचे शिक्षण श्रीरामांनी घेतले नाही, तर शस्त्र, धनुर्विद्या आणि प्रसंगी युद्धाला आवश्यक सर्व बाबींचे शिक्षण घेतले. त्यात पारंगत झाले. श्रीरामांना एकबाणी म्हटले जाते. एकदा रामाने प्रत्यंचेला बाण लावला की, तो सुटणारच, अशी ख्याती श्रीरामांची होती.
‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा। यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा॥’, आधुनिक काळातील वाल्मिकी असणाऱ्या ग. दि. माडगुळकर म्हणजेच गदिमांनी गीतरामायणातील या रचनेत विश्वामित्र अयोध्येत येऊन राजा दशरथाकडे रामाला सोबत घेऊन जाण्याची विनंती करतात, याचे यथार्थ वर्णन अतिशय सुमधूर शब्दांत केलेले आढळते. विश्वामित्र येऊन राक्षस कसे त्रास देत आहेत, त्यांच्यामुळे यज्ञात सातत्याने विघ्न कशी येत आहेत, याविषयी सविस्तर सांगतात. तसेच आम्ही राजकृपा मिळावी, यासाठी आलो आहोत. रामाला माझ्यासोबत पाठवा, असे विश्वामित्र सांगतात. तेव्हा राजा दशरथ सुरुवातीला तयार नसतो. राम लहान असतो. एवढ्या प्रचंड मायावी राक्षसांना राम कसा सामोरा जाणार, ही चिंता बापाच्या मनाला लागून राहते. मात्र, विश्वामित्र ‘रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जायी पर वचन न जायी’, याची आठवण करून देतात. तसेच ‘बालवीर राम तुझा। देवो त्यां घोर सजा। सान जरी बाळ तुझा थोर योग्यता॥’, असा विश्वास देतात. कौसल्या माताही रामाला पाठवायला तयार नसते. मात्र, अखेरीस विश्वामित्रांच्या आग्रही मागणीनंतर मनावर दगड ठेवून राजा दशरथ रामाला पाठवायला तयार होतो. या घटनेपासूनच रणझुंजार राम म्हणजे नेमके काय, याची प्रचिती जगाला यायला सुरुवात होते.
एकट्या रामाला कसे पाठवायचे, या विचारात असताना लक्ष्मणाला सोबत पाठवण्याबाबत ठरते. तेव्हा विश्वामित्र या गोष्टीला संमती देतात आणि राम-लक्ष्मण विश्वामित्रांसोबत निघतात. ‘कौसल्ये, रडसि काय? भीरु कशी वीरमाय? उभय वंश धन्य रणीं पुत्र रंगतां॥’, असा धीर विश्वामित्र कौसल्या मातेला देतात. तसेच ‘मारिच तो, तो सुबाहु। राक्षस ते दीर्घबाहु। ठेवतील शस्त्र पुढें राम पाहतां॥’, असा विश्वास रामाच्या शौर्यावर दाखवतात.
मारिच आणि सुबाहु हे अतिशय ताकदीचे आणि मायावी राक्षस असतात. मारिच आणि सुबाहु यांचा वध करणे सोपे काम नसते. मायावी शक्तींचा पुरेपूर वापर या युद्धावेळी केला जातो. मात्र, सगळा मायावी खेळ ओळखून श्रीराम आणि लक्ष्मण एकमेकांच्या साथीने अचाट पराक्रम दाखवून अखेर दोघांचा वध करतात.
विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला केवळ युद्ध करण्यासाठी घेऊन जात नाहीत. तर प्रवासात अनेक शस्त्रविद्या, युद्धकौशल्य यांचा गुरुमंत्र देतात. विश्वामित्र हे आधी क्षत्रिय राजे असतात. मात्र, त्यानंतर आपल्या कठोर तपःश्चर्येच्या सामर्थ्यावर महर्षी होतात, ब्रह्मर्षी होतात. वैवस्वत मन्वंतर यांमध्ये सप्तर्षी सांगितले गेले आहेत. यात विश्वामित्र यांचा समावेश होतो. त्यामुळे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचे ज्ञान राम आणि लक्ष्मणाला देतात. विश्वामित्र हेच राम आणि लक्ष्मणाला जनकपुरी येथे घेऊन जातात. तिथे सीतास्वयंवरात विजय प्राप्त करून सीतेशी विवाह करतो.
पुढे रामाच्या ‘रणकर्कश’ याची प्रचिती वनवासात येते. वनवासात असतानाही श्रीराम शौर्याचे सामर्थ्य अनेक राक्षसांना दाखवत त्यांना यमसदनी धाडतात. अनेक ऋषी-महर्षी रामांना भेटत असतात. त्यांना आपली दुःखे सांगत असतात. राक्षसांना दंड करण्याची विनवणी करतात. रामचरणी आणि शरणी जे जे येतात, त्यांना श्रीराम निराश करत नाहीत. त्यांची संकटे, दुःखे दूर करतात. कबंध, विराध, खर-दूषण अशा अनेक राक्षसांशी घनघोर युद्ध करत त्यांचा वध केला. रामाने वालीचा वध केला. या सर्वांमध्ये कळसाध्याय ठरले ते राम आणि रावणाचे युद्ध.
सीतास्वयंवरात रावणानेही सहभाग घेतला होता. मात्र, शिवधनुष्य पेलणे रावणाला शक्य झाले नाही. कालांतराने सीताहरण करून रावणाने लंकेत नेले. श्रीरामांनी अथक प्रयत्नाने सीता नेमकी कुठे आहे, ते शोधून काढले. यात सुग्रीव, हनुमंत यांसह अनेकांनी श्रीरामांना सर्वतोपरी मदत केली, साथ दिली. सेतूबंधनानंतर अखेर श्रीरामांनी लंकेत पाऊल ठेवले. युद्ध अटळ होते, याचा अंदाज होताच. मात्र, तरीही एकदा प्रलयकारी विध्वंस होऊ नये, म्हणून रावणाकडे दूत पाठवून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रावणाला आपल्या शक्तिसामर्थ्याचा एवढा अहंकार होता की, तो कुणाचेच ऐकेना आणि शेवटी युद्धाला तोंड फुटले.
लंकेत झालेल्या युद्धात रावणाने त्याचे अनेक राक्षस मित्र आधी रणांगणी पाठवले. त्या सर्वांना राम-लक्ष्मणांनी धारातीर्थी केले. कुंभकर्णाला जागे करण्यात आले. त्यानेही समरांगणी हाहाकार माजवला. अखेर त्याचाही वध करण्यात आला. रावणाचा मुलगा इंद्रजित युद्धभूमीवर आला. मायावी शक्तींचा मोठ्या प्रमाणात वापर करत त्याने लक्ष्मणाला बेशुद्ध केले. हनुमंतांनी आणलेल्या संजीवनीतून लक्ष्मणावर उपचार केले आणि पुन्हा सज्ज होऊन अचाट पराक्रम गाजवत लक्ष्मणाने अखेरीस रावणपुत्राचा वध केला. या सर्वांवर कहर म्हणजे रावण आणि रामाचे युद्ध. स्वतः रावण युद्धात उतरल्यावर रामाने वानरसेनेचे नेतृत्व स्वीकारले. रावण आणि रामात घनघोर युद्ध झाले. रावणाकडे विविध प्रकारचे बाण, मायावी शक्ती, विविध प्रकारची अस्त्रे-शस्त्रे यांचे अक्षरशः भांडार होते. पण रामाने त्या प्रत्येकाचा बिमोड करत आपले वर्चस्व कायम राखले होते. काही केल्या रावणाचा वध होईना. शेवटी बिभीषणाने रामाला कानमंत्र दिला आणि एकबाणी रामाने रामबाण काढून रावणाचा वध केला आणि सीतेला परत मिळवले. काही दाव्यांनुसार, रामाने १४ हजार राक्षसांचा वध केल्याचे सांगितले जाते.
श्रीरामाचे शांत संयमी, धीरोदात्त स्वरुप जेवढे आकर्षक आणि मनमोहक आहे. तेवढेच समरांगणी युद्ध करतानाचे रणझुंजार श्रीरामाचे स्वरुप उग्र आणि आक्रमक आहे. याचकांसाठी, रामचरणी शरण येणाऱ्यांसाठी, आप्तेष्टांसाठी राम जेवढा प्रेमळ आहे, दयावान आहे. राक्षसांसाठी राम हा काळ आहे. शेवटी रामनाम सत्य राहते.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥
- देवेश फडके.