- देवेश फडके.
Shriram Aakhyan: अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा। पंञ्चकं नाम स्मरेन्नित्यं महापातकनाशनम्॥ भारतीय परंपरांमध्ये पंचकन्या म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्यात जनककन्या सीतेचा समावेश केला जातो. यावरून सीतेची महती आपल्याला कळू शकते. विदेह देशाचा म्हणजेच जनकपुराचा राजा जनक याची कन्या सीता तिलाच जानकी, वैदेही असे म्हटले जाते. सीतेच्या स्वरुपाचे वर्णन चंद्रवदना, शुद्धस्वर्णवर्णा, कोलांगिनी, रतीचे प्रतिरुप, आपल्या प्रभेने सर्व दिशांना प्रकाशित करणारी अशी विशेषणे वापरून केलेले आहे. राजाची कन्या आणि राजाची पत्नी असूनही तिचं आयुष्य किती चढ-उतारांनी व्यापलेलं होतं, त्या प्रसंगात तिनं कशी धीरोदात्तता दाखवली, याचे अनेक दाखले आपल्याला रामायणात सापडू शकतात.
सीता आणि श्रीरामांच्या विवाहाची कथा सर्वश्रुत आहे. जनक राजाने ठेवलेला ‘पण’ श्रीराम पूर्ण करतात. शिवधनुष्य केवळ उचलत नाहीत, तर प्रत्यंचा लावताना तो धनुष्य भंगतो आणि पुढे राम आणि सीता यांचा विवाह संपन्न होतो. अयोध्येसारख्या प्रतिष्ठित, कुळाची मोठी परंपरा असलेल्या राजघराण्यात सीता आणि सीतेच्या अन्य भगिनी विवाह होऊन जातात. खरे तर सुखी संसाराची स्वप्नं घेऊन अयोध्येत आलेल्या सीतेला अवघ्या काही दिवसांतच रामासह वनवासाला जावे लागते. श्रीरामाची पत्नी म्हणून आणि पत्नीधर्म म्हणून सीता रामासह वनवासाला जाते.
श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. तसेच अगदी सीताही मर्यादेचे मूर्तिमंत आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल. याचे कारण विवाह झाल्यावर एखादी नवी नवरी प्रथम सासरी जाते, तेव्हा निश्चित काही मनिषा घेऊन जाते. मात्र, सासरी उत्साहात स्वागत झाल्यानंतर लगेचच १४ वर्षे वनवास पदरी पडतो. अशा परिस्थितीतही सीतेने मर्यादा ओलांडली नाही. नवऱ्याला, दीरांना, सासू-सासरे, सासरच्या अन्य मंडळींना कधीही बोल लावले नाही. इतकेच नव्हे तर सीतेच्या वडिलांनी, माहेरच्यांनी कधी दशरथाला बोल लावले नाही. सर्व गोष्टी, प्रसंगांना अगदी संयमितपणे, धैर्याने सामोरी गेली.
सीतावर राम हा अगदी आदर्श पुत्र, तसा आदर्श पती आहे. वनवासाला गेल्यावर सीतेला काय हवे, काय नको, हे विचारणारा राम आहे. आपण कैकयी मातेला वचन देऊन बाहेर पडलो खरे. पण सीतेलाही आता वनवास भोगावा लागणार आहे, याची पूर्ण जाणीव असणारा राम आहे. अरण्यकांडातील एका प्रसंगातून सीतेला सन्मान देणाऱ्या, तिचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या, तिचे मत जाणून घेण्याऱ्या रामाचे दर्शन आपल्याला घडते. धनश्री लेले याबाबत केलेल्या निरुपणात एक गोष्ट सांगतात. वनवासात असताना दंडकारण्यात प्रवेश करण्यापूर्वी ऋषी-मुनी श्रीरामाकडून संरक्षणाचे वचन मागतात. श्रीरामही नरभक्षकासह ऋषी-मुनी, साधुजनांना त्रास देणाऱ्या सर्व राक्षसांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करतात, हे ऐकल्यावर सीतामाई रामाला म्हणतात की, तीन दोष असतात, ते माणसाला खाली-खाली घेऊन जातात. ते म्हणजे मिथ्या वाक्यम्, परदाराभिगमनं आणि विना वैरं च रौद्रता. पहिले दोन तुम्ही कधीही करणार नाही, हे मला निश्चित ठाऊक आहे. तुम्ही कधीही खोटे बोलणार नाही, तुम्ही कधीही परस्त्रीकडे पाहणार नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. त्याबाबत मी निर्धास्त आहे. मात्र, तिसऱ्या दोषाची मला धास्ती वाटते. ते म्हणजे वैर नसताना रौद्ररुप घेणे, हा दोष असून तो माणसाला खाली आणतो.
अरण्यकांडात पुढेही श्रीराम आणि सीतामाईचे असे अनेक संवाद आले आहेत. यावरून आपली एक पत्नी म्हणून विचार मांडण्याचे स्वातंत्र्य सीतेला आहे, हे समजते. तसेच श्रीरामांना आपण काय करत आहोत, याची पदोपदी जाणीव असते. तरीही ते वेळोवेळी सीतामाईचे मत जाणून घेताना दिसतात. पुढे रावण येऊन सीताहरण करतो. त्यावेळी मात्र श्रीरामांची झालेली अवस्था अतिशय बिकट होते. आपल्यासाठी सीता वनवासात आली. आपल्या जबाबदारीवर सीतेला वनवासात आणले. तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन आपण घरच्यांना दिले आहे. अशा अनेक गोष्टी श्रीरामांसमोर आवासून उभ्या राहतात आणि कितीही मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांचा बांध अखेर फुटतो. संयम सुटतो. सैरावैरा पळू लागतात. सावलीप्रमाणे कायम संगत करणाऱ्या लक्ष्मणाला नको-नको ते बोल लावतात.
धैर्यवान, संयमी राम क्षणार्धात बलहीन होतो. मात्र, आता सीतेचा शोध घ्यायला हवा. या विचाराने पुन्हा उठून उभा राहतो. कुठे जायचे, कोणत्या दिशेला शोध घ्यावा, याची यत्किंचित कल्पना नसतानाही मिळेल, ती वाट तुडवत पुढे जातो. लक्ष्मणही रामासोबत शोधमोहिमेत कामाला लागतो. दक्षिण दिशेला पुढे जात असताना, सीतासंदर्भातील काही पुरावे सापडतात. दागिन्यांचे काही तुकडे सापडतात. पुढील प्रवासात आदर्श भक्त, बुद्धिमान, शक्तिमान असलेल्या हनुमंतांची भेट होते. सुग्रीवाशी मैत्री होते. जटायू, संपाती यांच्याकडून सीता नेमकी कुठे आहे, याचा ठावठिकाणा लागतो. सर्व वानरसेना आणि सहकारी घेऊन श्रीराम सेतूबंधन करत लंकेत दाखल होतो. तुंबळ युद्ध करत रावणाचा वध करतो आणि अथक परिश्रमाने, कष्टाने, आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत अखेरीस सीतेला सोडवतो.
या सर्व गोष्टी घडेपर्यंत १४ वर्षांचा कालावधी लोटतो. पुन्हा सीतेला डोळ्यासमोर पाहून श्रीरामांना काय वाटले असेल, मनाची अवस्था काय झाली असेल, घेतलेले परिश्रम, मेहनत, कष्ट सार्थकी लागणे म्हणजे काय, याचा एक प्रत्यक्ष अनुभवच श्रीरामांनी घेतलेला असावा. शेवटी एकदा मनुष्यरुपात जन्म घेतल्यावर मानवाचे भोग हे देवालाही चुकलेले नाहीत, हेच खरे. एक प्रकारे सीतमाईला परत आणणे ही श्रीरामांसाठी मोठी परीक्षाच होती. रावणासारख्या बुद्धिमान, मायावी योद्ध्याला पराजित करणे अजिबात सोपी गोष्ट नाही आणि हे फक्त आणि फक्त एकबाणी श्रीरामच करू शकत होते. मात्र, वनवास संपून पुन्हा अयोध्येत आल्यावर श्रीराम आणि सीतामाईचे स्वागत झाले.
वनवास भोगून दिग्विजय प्राप्त करून अयोध्येत परतलेल्या एकपत्नी असणाऱ्या श्रीरामांचे भोग अजून संपलेले नव्हते. जरा कुठे स्थिरस्थावर होऊन राज्यकारभार पुढे सुरू झाला आहे. रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणणे सुरू झाले होते, तोच सीतेबाबत जनतेत कुजबूज सुरू झाली. नको नको ते प्रश्न प्रजानन विचारू लागले. अखेर लोकशक्तीपुढे श्रीराम काही करू शकले नाही. प्राणांहूनी प्रिय असलेल्या सीतामाईला अयोध्या सोडून जा, असे सांगताना श्रीरामांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील, याची कल्पना न केलेलीच बरी. पुढे कुश-लव प्रत्यक्ष श्रीरामांसमोर येऊन रामचरित्र गायन करतात. ही दोन बालके आपलीच असल्याचे समजते, तेव्हाही श्रीराम अवाक् होतात. दुसरीकडे आदर्श पिता असलेले श्रीराम कुश-लव यांचा स्वीकार करतात. सांभाळ करतात. चांगले संस्कार देतात. कुळपरंपरेप्रमाणे वागण्याची शिक्षण देतात. शस्त्र-शास्त्रात पारंगत करतात. श्रीरामांचे रामराज्य पुढे कुश-लवही योग्य पद्धतीने सांभाळतात, अशी कथा सांगितली जाते.
इथे विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एवढे सगळे रामायण घडल्यावर, सासरच्या मंडळींकडून इतके सगळे भोगावे लागूनही सीता कधीही त्याबाबत अवाक्षर काढत नाही. कुश आणि लव यांच्यावर संस्कार करताना श्रीराम किंवा कुळाबाबत अपशब्द बोलत नाही. उलट रामचरित्र सांगून तो क्षात्रधर्म, कुळाचे संस्कार अधिकाधिक रुजवण्याचाच प्रयत्न सीतामाई करते. म्हणूनच श्रीरामांसमोर जाताना कुश आणि लव नम्रतेने, शरणागता प्रमाणे जातात. तेही कधी पित्याबद्दल तिरस्कार करत नाही. पित्याला बोल लावत नाहीत. अखेर पित्याकडे मुलांना सोपवून सीता धरणीत सामावते. त्यावेळीचीही श्रीरामांची अवस्था न चिंतिलेली बरी. कितीही धीरोदात्त मनुष्य अतिशय प्रिय व्यक्तीला गमावतो, तेव्हा त्याला होणाऱ्या वेदना समजून घेण्यापलीकडील असतात.
आदर्श पती, एकपत्नी, आदर्श पिता होणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी किती झिजावे, कष्टावे, त्यागावे, सहन करावे लागते, हे श्रीरामांकडून शिकण्यासारखे आहे. श्रीराम किंवा रामायणातील अनेक गोष्टी आजही लागू होतात. म्हणूनच रामायणाला कालातीत म्हटले गेले आहे. काळानुरूप कितीही बदल झाले तरी, पती-पत्नी नातेसंबंध, पिता-पुत्र किंवा पिता-अपत्य नातेसंबंध, सून-सासर, जावई-सुनेचे माहेर, कितीही तऱ्हेवाईक असले तरी नातेवाईक या अशा काही गोष्टी या बदलत नाहीत. त्या युगाप्रमाणे या युगातही त्या त्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. अनेकदा पत्नीनेच पतीसाठी बहुतांश सर्व करावे, असा आग्रह धरला जातो. पत्नीसाठी करणारे पतीही आहेत. पण पतीकडून तशी अपेक्षा केली जात नाही. या सर्व बाबतीत श्रीराम कायम उजवे ठरतात.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥