- देवेश फडके.
Shriram Aakhyan: जोपर्यंत हे जग आहे, जोपर्यंत जगात भाषण, संवाद सुरू राहणार आहे, तोपर्यंत प्रभू श्रीरामांची गाथा, श्रीरामांचे चरित्र आणि रामायण हे या पृथ्वीवर कायम राहणार आहे, असे अमरत्वाचे वरदान लाभणे क्वचितच आढळून येते. प्रभू श्रीरामांची गाथा, प्रभू श्रीरामांचे चरित्र हे भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये जे जे उदात्त, उत्तम, उत्कट, भव्य, दिव्य महन्मंगल आहे, त्याच्याही पलीकडील असल्याचे सांगितले जाते. श्रीराम हे संपूर्ण भारतवर्षाचा आत्मा आहेत. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम राम, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श मित्र आहेत. धैर्य, शौर्य, संघर्ष, नीतिसंपन्नता, सदाचरण, नि:स्पृहता, बुद्धिमत्ता सारेच अतुल्य आहे. श्रीराम एकवचनी, एकबाणी, एकपत्नी, तपस्वी, राजनीतिज्ञ, अभ्यासू, संशोधक, श्रेष्ठ प्रशासक आहेत.
श्रीराम हे सर्वांचे आहेत. श्रीराम आपले वाटणार नाही, असा माणूस क्वचितच सापडेल. अयोध्येत श्रीराम मंदिर प्रत्यक्षात साकारल्यावर कोट्यवधी भाविकांना अक्षरशः दिवाळी साजरी केली. श्रीराम जसे सर्वांचे आहेत, तसे ते कौसल्या माता, सीता माता, लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न यांपासून अहिल्या, शबरी, जटायू, जाबुवंत, हनुमंत, सुग्रीव, बिभिषण, सर्व वानरसेना, अयोध्येचे सर्व प्रजाजन आणि लव-कुश यांचेही आहेत. कौसल्या राणीचे भाग्य थोर की, त्यांच्या पोटी देव जन्माला आले. असे म्हटले जाते की, दिव्यत्व एकदम, अचानक घडत नाही. त्यासाठी कित्येक पिढ्यांचा संघर्ष, त्याग आणि पुण्य साचावे लागते. या सर्वांचा परिपाक झाला की, अद्भूत, अद्वितीय, अनाकलनीय आणि अतुल्य इतिहास घडतो.
श्रीरामांची कुळ परंपरा ब्रह्मदेवांपासून सुरू होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पाचव्या पिढीतील इक्ष्वाकु यांनी अयोध्या राजधानी केली आणि इक्ष्वाकु कुळाची स्थापना केली, असेही म्हटले जाते. या कुळपरंपरेतील सुमारे ४० व्या पिढीत श्रीराम जन्माला आले, असे म्हणतात. श्रीरामांच्या जन्माची कथा ही पुत्रकामेष्टि यज्ञापासून नाही, तर श्रावण बाळाच्या कथेपासून होते. श्रावण बाळाच्या कथेत दशरथाचा बाण लागणे, श्रावण बाळाला देवाज्ञा होणे, श्रावण बाळाच्या वृद्ध आई-वडिलांनी टाडो फोडून दशरथाला शाप देणे आणि प्राणत्याग करणे, या घटनेपासून श्रीरामजन्माची कथा सुरू होते.
दशरथाचे कुळ, राजगादी आणि राज्य हे कितीही चांगले असले तरी या सगळ्या वैभवाला, थोर परंपरेला, कुळाला वंश नाही, ही खंत कायम सतावत असे. मात्र, तुझाही मृत्यू पुत्रवियोगात होईल, असा दिलेला शाप खरे पाहता, एक प्रकारे वरदानच ठरला. कोसल देशाचा राजा भानुमंत यांची कन्या कौसल्या. राजा भानुमंताने कन्या कौसल्या हिला विवाहात दहा हजार गावे भेट म्हणून दिली होती असे म्हणतात. यावरून कौसल्या राणी कुणी सामान्य नव्हती, हे लक्षात येते. वंशवृद्धी होत नाही, म्हणून कौसल्या राणीही अगदी व्यथित होत असते. आधुनिक वाल्मिकी म्हणून ख्याती असलेल्या ग. दि. माडगुळकर यांनी रचलेल्या ‘गीत रामायणा’त कौसल्या मातेच्या निराश मनाचे, कौसल्या मातेच्या त्या भावविश्वाचे अगदी सुंदर चित्रण ‘उगा कां काळिज माझे उले? पाहुनी वेलीवरची फुले’ या रचनेत आले आहे. तसेच ‘उदास का तू? आवर वेडे, नयनांतील पाणी, लाडके कौसल्ये राणी’ या काव्यातून दशरथ राजा कौसल्या राणीची समजूत काढतानाचे चित्रण आले आहे.
अखेर पुत्रकामेष्टि यज्ञ होतो, अग्निदेव पायसदान देतो आणि चैत्र शुद्ध नवमी तिथीला दशरथाच्या कुळात श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म होतो. कौसल्या राणीसह अयोध्याजनांच्या आनंदाला पारावार राहत नाही. हर्षोल्हास साजरा होता. कौसल्या राणी आणि श्रीराम यांचे नाते अतिशय वेगळे आहे. आपण लहान असताना रामायण, महाभारत आणि अन्य देवी-देवतांच्या कथा सांगितल्या जातात. संस्कार केले जातात. मात्र, कौसल्या मातेने श्रीरामांना कोणत्या कथा, गोष्टी सांगितल्या असतील, प्रत्यक्ष देव असले तरी कौसल्या मातेने श्रीरामांवर संस्कार करण्यासाठी काय केले असावे, याची उत्सुकता वाटते.
कौसल्या मातेला इतक्या वर्षांनंतर पुत्रप्राप्ती होऊनही पुत्र वियोग अधिक सहन करावा लागला, असे एकंदरीत दिसते. आईच्या मनाची अवस्था प्रत्येक घटनेवेळी काय होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. कारण मनुष्याची असो वा देवाची असो, आई ही आईच असते. आपले मूल वाढताना, मोठे होताना, तरबेज होताना, कीर्ती मिळवताना, यश-प्रगती करताना पाहणे कोणत्याही आईसाठी एक सोहळाच असतो. जरा मूल नजरेआड झाले, मुलाला उशीर झाला, मुलाशी संपर्क झाला नाही, तर आई जेवढी कासावीस होत असते, तेवढे कोणीही होत नाही. ती मनाची हुरहुर कोणी समजून घेऊ शकत नाही.
श्रीराम थोडे मोठे झाल्यावर शिक्षणासाठी गुरुगृही जातात. गुरुकुलात राहून त्या काळातील पद्धतीप्रमाणे अगदी सामान्य विद्यार्थ्यांसारखे शिकतात. धर्म, शस्त्र, शास्त्र यांमध्ये पारंगत होतात. तेथून परतल्यानंतर अवघ्या काही काळात विश्वामित्र येऊन श्रीरामांना यज्ञरक्षण, ऋषी-मुनी, संतांचे संरक्षण करण्यासाठी घेऊन जातात. सीतास्वयंवर करून अयोध्येत परतल्यानंतर पुन्हा जल्लोष होतो, पण अळवावरील पाण्याप्रमाणे तो आनंदही विरतो आणि कैकयीच्या वचनामुळे श्रीरामाला चौदा वर्षे वनवासाला जावे लागते. त्यानंतरचा जो काळ अवतारसमाप्तीपर्यंत श्रीराम अयोध्येत व्यतीत करतात, तेवढाच काय तो कौसल्येला आई म्हणून श्रीरामांचा सहवास मिळतो.
श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम का आहेत, याची प्रचिती अनेक घटनांवरून येऊ शकते. यामध्ये आई कौसल्येचे संस्कार, कुळाची शिस्त, परंपरा यांचा मोठा वाटा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कैकयीने वचनपूर्ती मागितल्यावर श्रीराम सर्वप्रथम कौसल्याची आज्ञा घेण्यासाठी येतात. ती भले आई असली तरी ती राणीही आहे. कौसल्या आणि श्रीराम यांचा संवाद एकाचवेळी आई-मुलगा, तसेच राणी-युवराज असाही आहे. कैकयीही श्रीरामांची आईच असते. त्यामुळे एका आईने दिलेली आज्ञा पूर्ण करू नको, अशी दुसरी आई कशी सांगू शकते, असे प्रश्न श्रीराम कौसल्येला विचारतात आणि अखेर तिची संमती घेऊनच बाहेर पडतात. तेव्हापासून १४ वर्षे कौसल्या श्रीराम परतण्याची वाट पाहत असते. कौसल्येचे डोळे कायम श्रीरामाच्या वाटेकडेच लागलेले असतात. म्हणूनच रामरक्षेत रामाला कौसल्येचे डोळे म्हटल्याचे सांगितले जाते.
दशरथाचे निर्वाण झाल्यानंतर भरत-शत्रुघ्नासह सर्वजण श्रीरामांना भेटायला जातात. तेव्हा आता तुझे वडील या जगात नाही, हे सांगताना आई म्हणून कौसल्येची काय अवस्था झाली असेल? एकीकडे वडिलांचे वचन म्हणून १४ वर्षे वनवासाला निघालेला राम आणि दुसरीकडे वडिलांच्या निधनाची वार्ता सांगणे हे मोठे दिव्यच होते. असे असले तरी धैर्याने आणि संयमाने कौसल्येने श्रीरामाची घेतलेली भेट वेगळी ठरते. श्रीरामांना दशरथाच्या निधनाची वार्ता कुणी प्रथम सांगितली, यापेक्षा वडील गेल्यावर आई आणि मुलाची वनात झालेली भेट आणि ती घटना केवळ कष्टदायी, दुःखद आहे. ‘पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा’ असेच शेवटी म्हणावे लागते.
अखेर रावण वध करून श्रीराम १४ वर्षांनी अयोध्येत परतात. कौसल्या, कैकयी, सुमित्रा यांना अतिशय आनंद होतो. विशेष करून आई म्हणून कौसल्येला होणारा आनंद वर्णनातीत आहे. दिगंतरी कीर्ती करून पुत्र जेव्हा घरी येतो, तेव्हा त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको, असे आईला होत असते. मुलाचे किती कौतुक करावे, प्रशंसा करावी, त्याने मिळवलेल्या यशाचा पाढा किती वेळा वाचावा आणि किती जणांना सांगावा, असेच आईला वाटत असते. मुले कशीही असली तरी आईला प्रियच असतात. श्रीराम तर प्रत्यक्ष देवाचा अवतार. देवाची आई होणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. त्यानंतर मात्र कौसल्येला अगदी शेवटपर्यंत श्रीरामांचा सहवास लाभतो. इतक्या वर्षाचा संघर्ष, त्याग फळाला येतो. त्यावर कळस चढतो तो कुश आणि लव यांनी प्रत्यक्ष श्रीरामांसमोर येऊन रामायण सांगणे. प्रत्यक्ष श्रीराम, पित्यासमोर रामचरित्र गायन करणारी मुले ही आपलीच नातवंडे आहेत, हे कळते, तेव्हा एक आज्जी म्हणून कौसल्याला झालेला अत्यानंद शब्दांत वर्णन करता येण्यासारखा नाही.
कौसल्या एक आई म्हणून तिच्या नजरेतून रामाचे चरित्र चित्रण हे वेगळे ठरते. एका आदर्श पुत्राने जे जे करणे अपेक्षित असते, ते ते श्रीराम अगदी न कंटाळता, कोणतेही दुःख मनात न आणता, निराश न होता, त्रागा न करता, कोणालाही नावे न ठेवता, कोणाविषयी मनात अढी न धरता, शत्रूता न ठेवता अगदी शांतपणे करतात. एक आई म्हणून कौसल्या भरून पावते. प्रत्यक्ष देवाने पोटी जन्म घेणे, हे भाग्य सर्वांच्या पदरी नसते. आदर्श बंधू, आदर्श पती आणि पुढे आदर्श पिता म्हणून श्रीरामांनी सर्व कर्तव्यांचे केलेले पालन कौसल्येला पदोपदी आनंद देणारेच ठरते. असा हा कौसल्यासुत हृदयनिवास कौसल्येचा राम.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥