प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात. प्रदोषकाल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो. प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या तेरा तत्त्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. या कालावधिती केलेले शिवपूजन अतिशय फलदायी ठरते.
१९ जुलै रोजी शुक्रवार असल्याने आणि त्रयोदशी आल्याने ही तिथी शुक्र प्रदोष म्हणून ओळखली जाईल. वारानुसार जुळून येणाऱ्या प्रदोष तिथीला सोम, भौम, गुरु, शुक्र, शनी प्रदोष अशी नावे दिली जातात. आज शुक्र प्रदोष! शुक्र हा ग्रह भौतिक सुख देणारा ग्रह आहे. वैवाहिक जीवनात भौतिक सुखाची ओढ प्रत्येकाला असते. म्हणून विशेषतः पती पत्नीने हे व्रत आवर्जून करावे.
प्रदोष व्रताचा विधी:
प्रदोषव्रतादिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा (उपासानंतरचे भोजन) असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते. या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोषव्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पोपहार घ्यावा. मुख्य व्रतादिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा. तो प्रकृतीस मानवत नसेल, तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा. आणि जर उपासच शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी.
प्रदोषव्रताचा अधिकार :
प्रदोषव्रताचा अधिकार सर्व जातिधर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्रीपुरुषांना आहे. विशेषत: संबंधात अडथळे आलेल्या, संतती कुमार्गास लागलेल्या, कर्जाने पीडित झालेल्या, सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोषव्रत करावे. जितके काटेकोर, विधीपूर्वक, श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे व्रत केले जाते, तितके त्याचे अधिकाधिक फळ मिळते.
प्रदोष काळ :
प्रदोष काळ हा सायंकालीन संधिप्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो. पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सात वाजताची असल्याने पावणे सात ते साडे सात या कालावधीत शिवाभिषेक, स्तोत्रपठण, शिवमंत्राचा जप अवश्य करावा.
प्रदोष व्रताचे फळ :
महादेव ज्याप्रमाणे संकट काळातही स्थिर, शांत वृत्तीने परिस्थिती सांभाळतात, त्याप्रमाणे शिवपुजेने आणि विशेषतः प्रदोष व्रताने मन शांत होते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे व त्यावर मात करण्याचे बळ मिळते.
प्रदोष व्रताचे नियम :
हे व्रत दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येते. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत शुक्रवारी येत आहे. म्हणून याला शुक्र प्रदोष व्रत म्हटले जाईल. या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवन समृद्ध होते. केवळ फळे, फुले, धूप-दीप इत्यादींनी पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात, असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचबरोबर शिवकृपा प्राप्त होण्यासाठी अन्य उपायही सांगितले आहेत, ते जाणून घेऊया-
>> शुक्रवार देवीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी लाल, गुलाबी आणि पांढरे फुल देवीला वाहता येईल. ज्यांना विवाह ठरण्यात अडचण येत आहे त्यांनी यादिवशी शंकराला अभिषेक घालून पत्र, पुष्प, अत्तर लावून मनोभावे पूजा करावी.
>> ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत, वादावाद आहेत अशा दाम्पत्यांनी शुक्र प्रदोषाच्या मुहूर्तवार शिव पार्वतीची पूजा आवर्जून करावी. तसेच साधकाने ओम नमः शिवाय आणि ओम उमामहेश्वराभ्यं नमः या मंत्राचा जप करावा.
>> विवाहित जोडप्याने शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला लाल किंवा पांढऱ्या फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. ही पूजा शक्यतो एकत्र करून शिव पार्वतीच्या आशीर्वादाने नात्यातला गोडवा जपण्याचा प्रयत्न करावा आणि शिवपार्वतीचा आदर्श ठेवावा.
>> शिवाला भस्म प्रिय असल्याने पुरोहितांच्या संमतीने शिवलिंगाला भस्मलेपन करावे आणि शिवस्तोत्र गावे. या पूजेने मानसिक शांतात मिळते. तसेच दैनंदिन अडचणींमधून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते.
>> प्रदोष व्रताच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करावी. तसेच 'ओम गौरीशंकराय नमः' या मंत्राचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यासोबतच जीवनात सुख-समृद्धी येते.