आज वैशाख शुद्ध नवमी. ही तिथी सीता नवमी म्हणून ओळखली जाते. सीतेला जनक राजाने सांभाळली म्हणून तिला जानकी असेही म्हटले जाते. सीता ही जनकाची मानसकन्या असूनही त्यांनी पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला. एवढेच नाही तर तिला अनुरूप नवरा मिळावा यासाठी सीता स्वयंवर आयोजित केले. स्वयंवराचा उद्देश सफल झाला. सीतेला श्रीराम भेटले, परंतु म्हणावे तसे विवाहसौख्य मिळाले नाही. यामागे काय कारण असू शकते? जाणून घेऊया त्यामागचे कारण....
श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीनुसार बालपणापासून गुरु विश्वामित्रांच्या आश्रमात राहून शिकत होते. केवळ शिक्षण नाही, तर गुरुंच्या आश्रमातील झाडलोट, इतर कामेदेखील सर्वांना समानरित्या करावी लागत असत. त्याबरोबरीने विविध शास्त्रांचेही प्रशिक्षण सुरू होते.
एक दिवस, गुरुंजवळ बसून अध्ययन करत असताना आश्रमाबाहेरून वाजत गात एक मिरवणुक जात होती. लक्ष्मणाने कुतुहलाने बाहेर डोकावत गुरुजींना विचारले, `गुरुजी ही मिरवणुक कसली?'
गुरुजी रागावले, म्हणाले, `अभ्यास करताना अन्य गोष्टींकडे लक्ष जाता कामा नये.' तरीदेखील लक्ष्मणाबरोबरच सर्वांचेच कुतुहल जागे झाले. अगदी प्रभुु रामचंद्रांचेसुद्धा! गुरुजी म्हणाले, `इथे शिकून तुम्हाला १८ वर्षे होत आली, तरी तुम्ही एवढे अज्ञानी कसे? ही विवाहाची मिरवणुक आहे, एवढेही तुम्हाला कळत नाही का?'
आणखी एका शिष्याने पुढे विचारले, `गुरुजी विवाह म्हणजे काय?'
गुरुजी म्हणाले ठिक आहे, `याचे तुम्हाला प्रात्यक्षिकच घडवतो. उद्या मिथिला नगरीत जानकीचे स्वयंवर आहे. तिथे जाऊन तुम्ही स्वत:च बघा.'
असे म्हणत विश्वामित्र दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यांसह मिथिला नगरीत आले. तिथे स्वयंवरासाठी भला मोठा मांडव घातला होता. मांडवाच्या एका बाजूला उच्च आसनावर राजा जनक, गुरुवर्ग आणि राजदरबारातील समस्त स्त्रीवर्ग स्थानापन्न झाला होता. एका झिरमिळत्या, चकचकीत पडद्याआड जानकीदेखील बसली होती. स्वयंवरासाठी आलेल्या देशोदेशीच्या राजकुमारांकडे चिकाच्या पडद्याआडून पाहत होती. रावणाला पाहून ती घाबरली. तिने आपल्या आईला म्हणजे, पृथ्वीमातेला सांगितले, `काहीही झाले, तरी रावणाच्या हातून शिवधनुष्य तुटू देऊ नकोस.'
स्वयंवराला सुरुवात झाली. रावण आपणहून उठला आणि अहंकाराच्या भरात त्याने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, तसा तो धारातिर्थी पडला. दहा प्रयत्नानंतरही त्याच्याकडून धनुष्य उचचले जाईना. रावणाचे हे हाल, तर आपले काय, अशा विचाराने बाकीचे राजकुमार जागचे उठलेही नाहीत. लग्नघटीका टळून गेली. ते पाहून जनक राजा अस्वस्थ झाला आणि त्याने सभेत विचारले, `इते एकही वीरपुरुष नाही का? जो हे शिवधनुष्य पेलू शकेल? त्याच्याच हाती माझी कन्या जानकीचा हात देण्याचा मी निश्चय केला आहे.'
तेव्हा गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र उठले. त्यांनी शिवधनुष्याला नमस्कार केला आणि एका दमात धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडली. क्षणार्धात धनुष्य मधोमध मोडले. त्याचा प्रचंड आवाज झाला. त्या वीरपुरुषाला आपली जानकी सोपवण्यासाठी जनकाने कारवाई केली आणि प्रभु रामचंद्राचा आणि सीतेचा विवाह लागला.
मात्र, हा विवाह ठरवलेल्या मुहूर्तावर न लागल्यामुळे त्या द्वयींच्या वाट्याला संसार लाभूनही संसारसुख लाभले नाही. म्हणून लग्न मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे. मंगलाष्टकातही `आली समीप लग्नघटिका' असे म्हणतो, कारण तो मुहूर्ताचा क्षण सर्व ग्रहदिशांची अनुकुलता पाहून सुनिश्चित केलेला असतो. लग्न मुहूर्तावर लग्न गाठ बांधली गेली, तर त्याचे परिणामही शुभ मिळतात. म्हणून लग्न मुहूर्ताच्या बाबतीत कोणतीही हयगय न करता, नेमून दिलेल्या मुहूर्तावर लग्न लावण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा सीता माईने जे दुःख भोगले, तसे दुःख आपल्याही वाट्याला येऊ शकते...!