शनी देवाकडे प्रत्यक्ष न पाहता किंवा थेट समोर उभे न राहता बाजूला उभे राहून त्याची पूजा करावी असे म्हणतात. कारण त्याची वक्र दृष्टी पडली, की भल्याभल्यांची अवस्था पालटते. अर्थात तो अकारण शिक्षा करणारा देव नाही. जे चुका करतात त्यांना शिकवणारे शिक्षक असा शनी देवाचा खाक्या आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सहसा कोणी वर नजर करून पाहत नाही. त्यांना घाबरून असतात. एवढेच काय तर कुंडलीत आपल्या राशीला शनी देव आले या विचारानेही अनेक जण गर्भगळीत होतात. मात्र जे लोक प्रामाणिकपणे वागतात, विनम्रतेने सेवा करतात, दान धर्म करतात, दुसऱ्यांची मदत करतात अशा लोकांना शनी देव कधीच त्रास देत नाहीत, याउलट उन्मत्त झालेल्या लोकांना ते सोडतही नाहीत. त्यांच्याबद्दल अशीच एक पौराणिक कथा सांगितली जाते ती रामायणकाळातली.
रावण हा हुशार, विद्वान, शंकर भक्त आणि शूरवीर असूनसुद्धा अहंकाराने उन्मत्त बनलेला होता. शनीचा आणि इतर ग्रहांचा पराभव केल्यावर त्यांना उलटे झोपवून त्याच्यावर पाय ठेऊन तो कायम सिंहासनावर बसलेला असे.
एकदा नारद रावणाच्या भेटीला आले असता त्यांनी या ग्रहांची दशा बघितली, आणि विशेषत: शनीला ते म्हणाले, 'काय रे, इतरांना धडे देतोस, जाब विचारतोस आणि इथे रावणापुढे का नांगी टाकून बसला आहेस?'
त्यावर शनी नारदाला म्हणतात, 'मी पालथा असल्याने रावणावर माझी दृष्टी पडत नाहीये. काही तरी करा आणि मला उपडे झोपावा. मग माझी दृष्टी रावणावर पडली की मजा बघा. '
मग नारद रावणाकडे जाऊन त्याला म्हणतात, अरे तू या ग्रहांच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर बसतोस हे ठीक आहे, पण खरी मजा तेव्हाच येईल जेव्हा तू त्यांच्या छाताडावर पाय देऊन बसशील. उन्मत्त रावणाला हे पटते आणि तो सगळ्या ग्रहांना उपडे झोपवतो आणि त्यात शनी देवालाही वळवतो आणि त्यांच्या छाताडावर पाय ठेवून बसतो. तेव्हा शनी देवाचा जळजळीत कटाक्ष त्याच्यावर पडतो आणि रावणाचा ऱ्हास होण्याचा काळ सुरू होतो.
तात्पर्य हेच, की विजय मिळाला तरी त्याचा उन्माद योग्य नाही. आपल्यावर मात करणारी व्यक्ती आपल्याला भेटतच असते. त्यामुळे आपल्याला शास्त्राची शिकवण आहे, 'विद्या विनयेन शोभते!'