'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' असे म्हणत आपल्या संतांनी थेट वृक्ष वेलींशीं सोयरीक जोडली आहे. आपण त्यांचे अभंग म्हणतो परंतु त्यांनी दिलेला संदेश लक्षात घेत नाही. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यावर भर देत नाही मग अंगाची काहिली झाली, सावली मिळाली नाही, पाऊस वेळेत पडला नाही की रडत बसतो. म्हणूनच संत वचनाला स्कंद पुराणाची जोड देत वृक्ष लागवडीचे महत्त्व समजून घेऊ.
सध्या आपण पाहतो, की रस्त्याच्या दुतर्फा परदेशी झाडांनी देशी झाडांची जागा व्यापून टाकली आहे. त्या झाडांचा ना सरणाला उपयोग ना सावलीला. केवळ पाला पाचोळा नि कचरा. त्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी नेहमी आंबा, वड, पिंपळ यांच्या लागवडीवर भर दिला. त्याला अध्यात्मिक तसेच शास्त्रीय आधार सुद्धा आहे. कसा ते जाणून घेऊ... स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे:
अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् ।कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।
अश्वत्थः = पिपंळ, पिचुमन्दः = कडूनिंब, न्यग्रोधः = वट वृक्ष, चिञ्चिणी = चिंच, कपित्थः = कवठ, बिल्वः = बेल, आमलकः = आवळा, आम्रः = आंबा (उप्ति = झाडे लावणे)
जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही. असा या श्लोकाचा अर्थ आहे. यावरून आपल्याला वरील झाडांचे अध्यात्मिक महत्त्व तर कळलेच. शिवाय त्याचे भौगोलिक महत्त्व देखील समजून घेऊ.
गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत. तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू.
दुष्काळाचे खरे कारण
पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. हे वाचुन आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे. पिंपळ कार्बन डाय ऑक्साइड १००% शोषून घेतो, तर वड ८०% आणि कडुलिंब ७५% शोषतो आणि ही झाडे परिसराला गारवा निर्माण करतात तसेच प्राणवायू देऊन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात.
काही वर्षांपूर्वी यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात झाली. यूकेलिप्टस फार पटकन वाढते. दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते.गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्वमहामार्गांवर दुतर्फा लावले गेली आहेत. त्यामुळे उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे.
पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात. त्याच्या स्तुती मध्ये एक श्लोक आहे -
मूले ब्रह्मा त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच!!पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते!!
पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू, शाखांमध्ये महादेव यांचे वास्तव्य असते तर सर्व पानापानांमध्ये अन्य देवतांचे वास्तव्य असते. म्हणून पिंपळाला अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्याची पूजादेखील केली जाते. विशेषतः हे झाड पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत बीजारोपण होऊन रुजले जाते. पण काही लोक तेही खुडून टाकतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात. त्यांना रोखले पाहिजे आणि पिंपळाची सळसळ, चैतन्य वातावरणात रुजवली पाहिजे.
आपण जितकी जास्त वड, पिंपळ, आंबा, कडुलिंब यांची झाडे लावू, तेवढा आगामी पिढीला त्याचा फायदा होणार आहे. देश प्रदूषण मुक्त होईल. पुढची पिढी आपले आभार मानेल. त्यासाठी पावसाळ्यापूर्वीच या वृक्षाची लागवड सुरू करा. या पुण्यकर्माने जिवंतपणी तर नाहीच पण मरणोत्तरही नरकाचे तोंड बघावे लागणार नाही अशी स्कंद पुराणाने हमी दिली आहे!