जेवण झाले का? हा समाज माध्यमांवर गाजलेला प्रश्न! परंतु ही चौकशी म्हणजे केवळ औपचारिक संभाषणाची सुरुवात. मात्र, पूर्वीच्या काळी अतिथीला आपुलकीने हा प्रश्न विचारला जाई किंबहुना जेवूनच पाठवले जात असे. स्वयंपाक झाला, की लगोलग पाने घेतली जात. ही पाने कोणती? तर केळीची! कारण, दारोदारी केळीचे झाड असल्यामुळे दोन्हीवेळचे जेवण केळीच्या पानावर किंवा पत्रावळींवर होत असे. शास्त्रीयदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या या पानांना अतिशय महत्त्व होते. मात्र आता पाने घेतो म्हटल्यावर ताटं वाट्या किंवा प्लास्टिक प्लेट्स घेतल्या जातात. परंतु, जो स्वाद आणि पोषणमूल्य पानांमध्ये आहे, तो कचकड्याच्या भांड्यांमध्ये नाही, हे आपणही मान्य करू.
केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात. केळीच्या पानांवर जेवल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.
केळीच्या पानावर जेवण ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. जेवण झाल्यावर केळीची पाने गुरांना खायला दिल्यास त्यांचेही पोट भरते व कचऱ्याच्या ढिगाला आळा घालता येतो. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते.
काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. केळीच्या पानात केलेली पानगी, इडली, मोदक आणि अनेक पदार्थ अत्यंत चविष्ट लागतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. परदेशातील भारतीय उपहारगृहात विशेषकरून केळीच्या पानावर पारंपरिक जेवण वाढले जाते व त्यास पसंतीही मिळते. म्हणून शक्य तेव्हा आपणही केळीच्या पानावर जेवावे आणि जेवणाआधी हे दान पदरात टाकणाऱ्या ईश्वराचे आठवणीने स्मरण करावे.