प्राचीन काळात वेदांचे अध्ययन केले जात असे. त्यात छंद, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, कल्प इ. प्रशिक्षण दिले जात असे. हे सहा वेदांग आहेत. ज्यांना त्यात रस वाटत असे, ते विद्यार्थी या वेदांगांचा सखोल अभ्यास करत असत. यात ज्योतिषाला वेदांगांचे नेत्र मानले गेले आहे. ज्योतिष विद्येचा आवाका अतिशय मोठा आहे. त्यात पंचांग हा एक भाग झाला. पंचांग रोज पाहण्याचे आणि ऐकण्याचे अनेक लाभ आहेत. आताच्या काळात दिनदर्शिकेवर पंचांगातील मुख्य माहिती दिलेली असते. लोक त्यांच्या सोयीने आणि गरजेप्रमाणे ती माहिती वाचतात. परंतु त्यामुळे रोजची तिथी वार नक्षत्र कळत नाहीत. यासाठी पंचांग वाचनाची सवयच उपयोगी ठरते. म्हणून पूर्वीचे लोक घराबाहेर पडण्याआधी पंचांग वाचून मगच बाहेर पडत असत.
का वाचावे पंचांग ?भारतीय ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान किती पुरातन आहे, याची कल्पना पंचांग वाचनावारून लक्षात येते. दुर्बीण, परग्रह यान, अवकाश शास्त्र अशा संकल्पना विकसितही झाल्या नव्हत्या, अशा काळात आपल्या पूर्वजांनी ग्रह, नक्षत्र, तारे यांची आकाशात काय आणि कशी स्थिती असेल याचे गणित मांडून ठेवले आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी, नक्षत्र यांची स्थिती वेदांमध्ये देखील वर्णन करून सांगितली आहे. ग्रह स्थिती, अंतर आणि गती यावरून पृथ्वीवर दिवस रात्र यांचे अचूक कालमानपन केले आहे. यावरून सटीक पंचांग बनवले आहे. बारा महिने म्हणजे एक वर्ष आणि सात दिवस म्हणजे एक सप्ताह ही संकल्पना विक्रम संवत्सरापासून सुरु झाली. महिन्याचा हिशोब सूर्य आणि चन्द्राच्या गतीवर ठरवला जाऊ लागला.
शास्त्रात म्हटले आहे, की दैनंदिन तिथीचे श्रवण आणि पठण केल्यास लक्ष्मी मातेची कृपा होते. कारण कोणत्या तिथीला कोणते काम करायाला हवे, याचे ज्ञान तिथीनुसार कळते. आपोआप धनलक्ष्मीच्या आगमनाची वेळ आपल्याला लक्षात येते.
वार आणि त्यासंबंधी माहिती पंचांगात दिलेली असल्यामुळे त्यानुसार दैनंदिन कार्याला गती देता येते. तसेच दिवस वारानुसार दान धर्माचे महत्त्व लक्षात येते. त्यानुसार कृती केल्यामुळे पुण्य प्राप्त होऊन आयु वाढते.
नक्षत्र पठण केल्यामुळे पाप नष्ट होते. कारण पंचांगात २७ नक्षत्रानुसार त्यांचे महत्त्व आणि त्यांचे लाभ मिळवण्यासाठी दिलेले उपाय याची सविस्तर माहिती दिलेली असते. त्याचे पालन होऊन पाप क्षालन होण्यात मदत होते.
योग पठण केल्यामुळे आप्त जनांच्या भेटी गाठी होतात आणि शुभ अशुभ योग यांची माहिती असल्यामुळे वियोगाचे प्रसंग टाळता येतात. कोणत्या तिथीला काय करावे याची माहिती तसेच शुभ मुहूर्त त्यात दिलेले असतात.