प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय.ही तिथी १७ जुलै रोजी सोमवारी येत असल्याने तिला सोम प्रदोष म्हटले जाईल. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (संध्याकाळी) सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते.
प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोम प्रदोष म्हणतात. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. सोम प्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते.
प्रदोष पूजा विधी : या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे. घर स्वच्छ करावे. देवाची पूजा करावी. शिवलिंगावर बेल वाहावे. जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्याचप्रमाणे महाकाल शंकराच्या महामृत्युंजय जपाचेही पठण करावे.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्।उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।
ही प्रदोष पूजा करताना चुकूनही शिव तांडव स्तोत्र घरात म्हणू नये! अलीकडे अनेक घरातून हे स्तोत्र मोठ्याने लावले जाते. मात्र ही शिवस्तुती असली तरी ती घरात म्हणणे शुभ ठरणार नाही.
शिव तांडव स्तोत्राची पार्श्वभूमी:
हे स्तोत्र शिव स्तुती असून लंकाधीश रावण त्याचा रचेता आहे हे आपण जाणतोच. परंतु ही स्तुती त्याने कोणत्या स्थितीत केली आणि त्या रचनेचा त्याला काय लाभ झाला हे जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
रावण हा शिवभक्त होता. लंकेत शिवाचे स्थान असावे या विचाराने त्याने शिवाची आराधना केली, मात्र शिव प्रसन्न झाले नाही म्हणून रावणाने अहंकाराच्या भरात कैलास पर्वतच मुळासकट उपटून लंकेत नेण्याचा प्रयत्न केला. या कृतीचा शिव शंकरांना राग आला आणि त्यांनी आपल्या नुसत्या अंगठ्याने रावणाला पाताळाच्या दिशेने दाबले. त्यामुळे रावण गयावया करू लागला आणि त्याने हि शिवस्तुती रचली. शंकराचा राग शांत झाला आणि रावणाची शिव कोपातून सुटका झाली. मात्र रामाविरुद्ध लढाईत रावणाने याच स्तोत्राचा पुनर्वापर करून पाहिला तेव्हा मात्र शंकरांनी दुसऱ्याच्या विनाशाची इच्छा धरणाऱ्या रावणाला तुझाच पराभव होईल असा शाप दिला.
यावरून लक्षात घेतले पाहिजे, की शिव तांडव स्तोत्र ही शिव स्तुती असली तरी ती फलदायी नाही, कारण त्याच्या रचनाकारावरच शिवकृपा झाली नाही तर आपल्यावर शिवकृपा कशी होणार? त्यामुळे उपासना म्हणून हे स्तोत्र म्हणू नये असे धर्मशास्त्र सांगते.
शिव तांडव स्तोत्र घरात म्हटल्याचे दुष्परिणाम:
शिव तांडव स्तोत्रातील तांडव हा शब्द लक्षात घेतला तरी कळेल, की विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर म्हटले गेलेले स्तोत्र आहे. त्यातील प्रखर शब्द, त्यांचे उच्चारण आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात. हे स्तोत्र वीर रस जागृत करणारे असले तरी ते घरात म्हणण्याचे काहीच कारण नाही. तसे केले असता घराची युद्धभूमी होऊ शकते. तो धोका टाळायचा असेल तर घरात शिव तांडव स्तोत्राचे उच्चारण करू नका.
तांडव नृत्यासाठी स्तोत्राचा वापर
नृत्य कलेत सर्व तऱ्हेचे भाव दर्शवले जातात. त्यात सर्व रसांचाही समावेश केला जातो. त्यामुळे नृत्य सादरीकरणाच्या दृष्टीने रौद्र रसासाठी या स्तोत्राचा वापर केल्यास हरकत नाही, मात्र या व्यतिरिक्त स्तोत्राचे गांभीर्य जाणून घेत त्याचा सर्वसामान्य ठिकाणी वापर टाळणे हिताचे ठरते.