आज दीपावलीचा महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे लक्ष्मी पूजेचा. तसेच आज अश्विन अमावस्या. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे ती सोमवती अमावस्या म्हणूनही विशेष ठरणार आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजेबरोबर शिवशंकराची केलेली आराधना व्यक्तिशः स्वतःसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी फलद्रुप ठरू शकेल. जाणून घेऊया त्याची महती आणि पद्धत-
महामृत्युंजय मंत्राचे महत्त्वॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥ भगवान शंकराचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र. या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूची भीती कमी होते आणि दुर्धर आजारही बरा होतो. त्यासाठी भक्तिभावे या जपाचे मंत्रोच्चारण करावे लागते. वरील मंत्राचा अर्थ असा आहे, की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शंकराची उपासना करतो, ते या सृष्टीचे संरक्षण करतात. आमचे जीवन समृद्ध करतात, एवढेच नाही, तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात.
हा मंत्र रोगांपासून संरक्षण करतोरोज सकाळी अंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा. हा मंत्र सामूहिकरीत्या अर्थात कुटुंबासमवेत म्हटल्यास अधिक लाभदायक ठरतो. या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात. आपणास कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ ग्रासले असल्यास या मंत्राचा नित्यनेमाने १०८ वेळा जप करावा.
हा मंत्र अकाली मृत्यूपासून बचाव करतोभगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यू टाळण्यास मदत होते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गंभीर आजार, अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असल्यास या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येतो किंवा हा रोग झालेला असल्यास त्याच्याशी सामना करण्याचे, रोगावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते.
भीती दूर करून मनाला शांत करतोआपल्या मनात कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दररोज 108 वेळा या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि सर्व प्रकारची भीती दूर होते.
महामृत्युंजय मंत्र जप करण्याचे नियममहमृत्युंजय मंत्र सोमवार किंवा प्रदोष काळी जपावा. कारण हे दोन्ही दिवस भगवान शिवांचे असून या दिवशी मंत्र जाप केल्याने विशेष फायदा होतो. जप करताना केवळ रुद्राक्षच्या जप्याने जप करावा कारण असंख्य जपाचे फळ मिळत नाही. या मंत्राचा जप करताना शिवमूर्ती, शंकराचे चित्र, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र आपल्यासोबत ठेवा. जप करताना कंटाळा करू नका, आळस देऊ नका आणि मन एकाग्र ठेवा. मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नका. भक्तीने आणि श्रद्धेने या जपाचे नित्यपठण करा.