दुसऱ्याचे सांत्वन करताना आपण म्हणतो, 'मी समजू शकतो', वास्तविक पाहता, कोणीही कोणाचे दु:खं समजून घेऊ शकत नाही. आपबिती आल्याशिवाय दु:खाची झळ कळत नाही. म्हणून कोणाचे दु:खं समजून घेता आले, तरी हरकत नाही, पण समोरच्याला नावं ठेवण्याआधी एकदा, स्वत:ला त्याचा जागी नक्कीच ठेवून पहा. वाचा ही मार्मिक आणि मजेदार गोष्ट.
एका शेठजींकडे पाळीव कुत्रा होता. तो त्यांना अतिशय प्रिय होता. ते त्याला जीवापाड जपत असत. ते जिथे जात, तिथे त्यालाही नेत असत. कुत्र्यालादेखील शेठजींचा लळा होता. जणू काही दोघांचा गेल्या जन्मीचा ऋणानुबंध असावा, असे परस्परांशी नाते होते.
एकदा शेठजींना व्यवहारासाठी परगावी जावे लागणार होते. नौकाप्रवासाशिवाय पर्याय नव्हता. याआधी त्यांनी आपल्या कुत्र्याला इतक्या दूर नेले नव्हते. त्याला घरी सोडून जाण्यासाठी त्यांचा जीव होईना. त्याला सोबत न्यावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत असताना शेठजी प्रवासाचे सामान घेऊन जायला निघाले, तो कुत्रा त्यांच्याआधी जायला हजर! शेवटी त्यांनी कुत्र्याला सोबत घेतले.
नावड्याने त्याला प्रवेश नाकारला. शेठजींनी बरीच मनधरणी केल्यावर कुत्र्यालाही नावेत घेण्यात आले. त्या नावेने आणखीही काही प्रवासी प्रवास करत होते. नावाडी नाव वल्हवत दुसऱ्या तीराच्या दिशेने नेत होता. प्रवास सुरू होता. पाण्यावर हलणाऱ्या नावामुळे कुत्रा त्या प्रवासात घाबरला होता. तो भीतीने इथून तिथे धावपळ करत होता. त्याची अस्वस्थता पाहून अन्य प्रवासी घाबरले. अंग चोरून बसू लागले. त्या सगळ्यांच्या हालचालींमुळे नावही डोलू लागली. नदीच्या मध्यावर नाव पोहोचली होती. थोडा जरी तोल गेला, तरी नावेचा अपघात निश्चित होता. कुत्र्याला कसे आवरावे शेठजींना कळेना. त्यांचीही तारांबळ उडाली.
त्या नावेत एक आजोबा होते. ते शेठजींना म्हणाले, यावर मी तोडगा काढू का? शेठजींनी नाईलाजाने मान डोलवली. आजोबांनी एक दोन तरुणांना हाताशी घेऊन कुत्र्याला पकडले आणि शेठजींच्या डोळ्यादेखत पाण्यात फेकले. शेठजी ओरडू लागले. सगळ्याच प्रवाशांना आजोबांच्या अशा वागण्याचा धक्का बसला. आजोबांनी शेठजींसह सगळ्यांना शांत केले. तेवढ्यात कुत्रा पोहत, जीव वाचवत नावेच्या काठाला पकडून कुडकुडत होता. आजोबांनी त्याला वर ओढले आणि नावेत घेतले. कुत्रा गपचूप एका कोपऱ्यात जाऊन बसला. पण शेठजींचा राग अजूनही शांत झाला नव्हता.
यावर आजोबा शेठजींना म्हणाले, 'हे बघा, तुम्हाला माझा राग येणे स्वाभाविक आहे. पण हे मी आपल्या सर्वांच्या हितासाठी केले. तुमचा कुत्रा अजूनही इथून तिथे भीतीने पळत राहिला असता, तर त्याच्या भीतीने अन्य प्रवाशांपैकी कोणाचा तोल गेला असता. परिणामी एकामुळे पूर्ण नाव कलंडली असती. मात्र, आपल्याला वाटत असलेली भीती कुत्र्याला कळणार नव्हती. म्हणून मी त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली. पाण्यात पडल्यावर, नाकातोंडात पाणी गेल्यावर जीव मुठीत धरून कसे बसावे लागते, याची त्यालाही कल्पना आली. म्हणून तो गुमान कोपऱ्यात जाऊन बसला आहे.
आजोबांच्या या तोडग्यावर शेठजींना हसू की रडू असे झाले. काही का असेना, पण कुत्र्याचा इतरांना होणारा उपद्रव थांबला आणि पूर्ण प्रवासात शेठजींना आपल्या लाडक्या कुत्र्याची साथ मिळाली.
कठोर वाटणाऱ्या शिक्षा कधी कधी आपल्या भल्यासाठी असू शकतात. काही नियम आपल्याला जाचक वाटत असले तरी ते आपल्या प्रगतीसाठी असतात आणि काही कृती आक्षेपार्ह वाटत असल्या तरी त्यात सर्वांचे हित दडलेले असू शकते. म्हणून व्यक्त होण्याआधी क्षणभर थांबा, विचार करा, परिस्थितीचे अवलोकन करा नाहीतर आपली स्थिती पण शेठजींसारखी व्हायची!