- इंद्रजित देशमुखखल प्रवृत्ती म्हणजे परदु:खे सुखी. दुसऱ्याच्या दु:खाने जो सुखी होतो, त्याची प्रवृत्ती अंधारलेली असते. खल प्रवृत्तीने जगणारे लोक आईतखाऊ, आपमतलबी, अप्पलपोटी, आळशी असतात. जगाची व्यवस्थाच निसर्गाने अशी केली आहे की, परस्परविरोधी गुणांची माणसे त्याने तयार केली आहेत. प्रत्येक प्रकारचा नमुना इथे अस्तित्वात आहे. ज्याला या सभोवतालच्या विविधतेचा अंदाज येतो, तो आपले जगणे त्याप्रमाणे घडवत जातो. परसुखे सुखी व परदु:खे सुखी यांपैकी परदु:खे सुखी ही माणसे खूपच विक्षिप्त असतात. यांच्याशी कसे वागावे हे कळत नाही. अशा प्रकारची माणसे क्षुल्लक कारणावरून चिडत असतात, कांगावा करीत असतात, कुणाची भीडभाड ठेवत नाहीत. पायरी सोडून बडबडत राहणं हा त्यांचा स्वभाव असतो. सोशल मीडियावर जो सध्या ब्लेम गेम सुरू आहे; राजकारण्यांचा, अनेक विचारांच्या अनुयायांचा, त्यांच्या आयटी सेलमधील तथाकथित विचारवंतांचा, तो विकृतीने पछाडलेला आहे. माझं तेच खरं आणि माझ्या विचाराशिवाय वा विचाराला विरोध असेल त्यांना अस्तित्वच नाही. त्यांना अशा शब्दांत ठोकले जाते की, आमच्या संगोपनात व सहयोगी सहजीवनात ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध यांची पेरणी चुकली आहे का? आनंद पेरणारी सहअस्तित्व, सहयोगी सहजीवन, द्वेषमुक्त गावकी, भावकी व समाज कधी येथे नांदू शकेल की नाही, असे वाटते; पण प्रचंड आशावादी राहून, ज्यांची मांगल्यावर श्रद्धा आहे, त्यांनी मंगलाची-सुंदराची पेरणी करतच राहायला हवे. उद्याच्या सुदृढ पुनर्निर्माणासाठी हजारो काजव्यांच्या प्रकाशात काळरात्र संपवून उद्याचा सूर्य सारे काही प्रकाशमान करेल. त्याचसाठी पीयूषाचा सागर होऊन, प्रतिभेच रूप घेऊन, शब्दांना साधन बनवून बरसत राहूया.
मंगलाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 4:25 AM