जीवनात मज्जाच मज्जा आहे. मनसोक्त जगा असे जेव्हा माणूस म्हणतो तेव्हां गैर काही नाही सुध्दा. कारण जीवन तर जगण्यासाठीच आहे. सृष्टीच्या ताटात अस्तित्वाने विविध रसांची भरपूर व्यंजने वाढली आहेत. पण मनसोक्त जगणे ज्या विषयांचे आधारे होते ते खरोखर सत्य आहेत का? याचे जन्मोजन्मीच्या अनुभवाने सावध झाले ते संत उत्तर देतात. ते स्वतःही सावध झाले व आम्हालाही सावध करतात. संत एकनाथ महाराज म्हणतात विषय सत्य मानिती परम । हे देहाभिमानाचे निजवर्म । तेणे सज्ञान केले अधम । मरणजन्म भोगवी ॥मज्जा चांगली आहे. पण मजेचे जे विषय आहेत तेच परम सत्य आहेत, त्यावेगळे अन्य काही सत्य नाही हे देहाचा अभिमान, देहच खरा मानणारांचे वर्म आहे. तेथे धक्का लागला तर लोक चिडतात. म्हणून तर संतांचा छळ झाला. आमच्या मजेवर बोट ठेवतोस म्हणून लोकांनी संताचे अपमान केले. ज्यात सज्ञानीच जादा होते. नाथ महाराज म्हणतात, तेणे सज्ञान केले अधम. शहाणे सुरतेही, सज्ञानी अधम झाले. अधमचा अर्थ होताे अधर्मी, अहंकारी, दुष्ट, निच. स्वतःचे देह सुखासाठी इतरांनाही दुखविणारा. अज्ञानीचे ठीक आहे की त्याला अस्तित्वाचा धर्म समजणे सोपे नाही. पण देहाभिमानात बुध्दीवानही अधर्मी होतात यावर संत बोलतात. उपनिषदात म्हटले आहे की, अज्ञानी तर केवळ अंधकारात भटकतात, ज्ञानी महा अंधकारात भटकतात. अज्ञानीची संभावना आहे अंधारातून प्रकाशाकडे येण्याची, मात्र ज्ञान्याची नाही.यावर संत एवढेच म्हणतात की मग हा देहाभिमानच मरण भय निर्माण करतो व जन्म मरण भोगवितो.मनुष्याला मरणाची भीती का वाटते ? संत म्हणतात केवळ देहाभिमानामुळे. मी देहच आहे हा अभिमान मृत्युमुळे संपतो. मी संपतो व या मी शी मी ने जोडलेले आहे ते संतती, संपत्ती, नाव लौकिक सारे माझ्यासाठी संपते. म्हणून सज्ञानी देहाभिमानी अज्ञानीचे तुलनेत मरणाला जास्त भितो.
पुढती स्वर्ग पुढती नरक । पुढती जननी जठर देख । यापरी पंडित लोक । केले ज्ञान मुर्ख अहंममता ॥ संत एकनाथ महाराज म्हणतात, जन्म मरणात एक चक्र आहे. पुण्य केले स्वर्ग मिळेल. पाप केले नर्क मिळेल. त्यापायी जननी जठराचा गर्भवास साेसावाच लागेल. आदि शंकराचार्यांचे प्रसिध्द वचन आहे. पुनरुपी जननम् । पुनरुपी मरणम । पुनरुपी जननी जठरे शयनम् ॥अहंममते मुळे ज्ञानी पंडितही मुर्ख ठरतात. मुढ ठरतात. मुढचा अर्थच होतो की, ज्ञानाची क्षमता आहे पण बोध घेत नाहीत. अहंममतेत गुंतले जे परमार्थात गुंतायला हवे होते. मग जेथे ज्ञानी देहाचे ममतेत गुंतले तेथे अज्ञानी मनुष्याने देहाभिमान धरल्यास वेगळे काय. कारण त्याचे करिता देहाभिमान वेगळी अशी बोधाची अवस्था नाही. देहाभिमान ही सामान्य अवस्था आहे. मी देह आहे हा भाव उठणेही त्याचेसाठी कठीण आहे. मी म्हणजे मी. म्हणून संत सर्वांना बोध देतात. विषय सत्य नाहीत. विषय म्हणजे इंद्रियांना मज्जा वाटणार्या गोष्टी. आज विज्ञानामुळे दर प्रतिदिन त्यात नाविन्य येत आहे. मनुष्याचा त्यामुळे देहाच्या अतृप्तिचा भाव वाढता आहे. जेवढी अतृप्ती अधिक तेवढा देहभाव अधिक. तेवढ्या तृप्तीच्या इच्छा अधिक व इच्छा अधिकच्या तृप्तिसाठी मनुष्य आपले जीवनच काळाचे दावावर लावतो. अशा दावात सदैव मृत्यु जिंकला आहे. म्हणून संत चेतवितात विषयाबद्दल व विषय सत्य मानल्याने होणार्या देहाभिमानाबद्दल.
मोहिनी एकादशीचे दिनी संताचे उपदेशाचा अनुसरण बोध होऊन पांडुरंगाचे ध्यान लागो ही प्रार्थना.
शं.ना.बेंडे पाटील