हिंदूधर्मात आचाराला फार महत्त्व आहे. आचार, विचार व उच्चार हे सर्व एक दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. माणसाचे विचार जसे असतील त्याप्रमाणे त्याचे वागणे असेल. या विश्वामध्ये सुष्टशक्ती व दुष्टशक्ती दोन्ही वास करून आहेत. दोन्हीचा संघर्ष नेहमीच चालू असतो. सुष्टशक्ती ही विधायक शक्ती आहे तर दुष्टशक्ती ही विनाशक शक्ती आहे.
मनुष्य वाईट कृत्य करण्यास फार लवकर प्रवृत्त होतो. कारण त्यात तात्काळ फायदा दिसत असतो. मनुष्याचा एकदा तोल गेला म्हणजे दुष्टशक्ती त्या मनुष्यावर ताबा घेते. त्याची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते. दुष्टशक्तीने ताबा घेतल्यावर त्याला योग्य निर्णय घेता येत नाही. या लोकांच्या जीवनात, व्यवहारात प्रगती होत नाही. त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेत येत नाही. त्यांच्या खाण्यापिण्यात ताळमेळ राहत नाही व निषिध्द खाणे आवडते. त्यामुळे त्यांचा विकार बळावतो.
दुष्टशक्तीपासून नेहमी लांब राहण्यासाठी किंवा त्यापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी सतत ईश्वर स्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. सतत नामस्मरणाने एक प्रकारच्या विधायक शक्ती लहरी निर्माण होऊन दुष्टशक्तींची पकड कमी होत जाते. मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार येऊ लागतात.
चांगले विचार स्थिरावण्यासाठी चांगल्या आचरणाची आवश्यकता असते. आचरण म्हणजे केवळ चांगले वागणे नव्हे तर मनातले विचार देखील शुद्ध व सात्विक असणे. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. प्रत्येकाला स्वत:चे दोष लक्षात येतात व कळतातही. या दोषातून मुक्त होण्याचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे व त्याप्रमाणे प्रयत्नाला लागले पाहिजे.
चांगले आचार आणि विचार हे नेहमीच संस्कारधिष्ठित असतात. चांगल्या आचारापासून दूर नेणारे कार्यक्रम पाहू नयेत. पुस्तकांचे वाचन करताना धार्मिक पुस्तकाचे वाचन करणे केव्हाही चांगले. तसेच आत्मोन्नती किंवा प्रगती पथावर नेणारे विचार वाचावेत, ऐकावेत, चिंतन करावे. देवा-धर्मावर टीका टिप्पणी करणाऱ्याशी हुज्जत न घालता त्या विषयाला पूर्णविराम द्यावा. योग्य मित्र निवडावेत. नेहमी चांगल्या विचारांच्या मित्रांच्या संगतीत राहावे म्हणजे वाईट गोष्टी ऐकण्याचा प्रसंग येणार नाही.
व्यवहारातले वागणे नम्रतेचे असावे. शुद्ध व सात्त्विक आहार असल्यास मनात देखील शुद्ध व सात्त्विक विचार येतात. आपल्या वागण्यात बदल होण्यासाठी संतांचा सहवास महत्त्वाचा व उपयुक्त असतो. तुमच्या शुद्ध आचरणामुळे अथवा दृढ भाव निर्माण झाल्यामुळे तुमच्यावर ज्यावेळेला सद्गुरुंची कृपा होते त्यावेळेला विरुद्ध विचारांच्या व्यक्ती तुमच्यापासून आपोआप दूर होतात व तुमच्या प्रगतीचा मार्ग सोपा होतो.