ज्योत्स्ना गाडगीळ
काय म्हणतातेत नवीन वर्षाचे संकल्प? असा खोचक प्रश्न कोणी केला, तर रागावू नका. कारण, ठरवलेल्या संकल्पांपैकी सगळेच संकल्प पूर्ण होत नाहीत. पण म्हणून संकल्पच करायचे नाहीत का? तर नाही. संकल्पांमध्ये बदल करत राहायचे. इंग्रजीत म्हण आहे ना, ओन्ली चेंज इज परमेनंट थिंग! बाह्य जगात बदल घडवावे असे वाटत असेल, तर आधी स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवले पाहिजेत. ते आवश्यक बदल कोणते? यादी बरीच मोठी आहे, परंतु त्यातील प्रामुख्याने बदलाव्यात अशा पाच गोष्टी!
लवकर उठा: आजच्या मोबाईल युगात पहाट, सूर्य दर्शन, सूर्य नमस्कार या गोष्टी आपण विसरत चाललो आहोत. त्यात वर्क फ्रॉम होम मुळे तर व्यायामाचे वाजले की बारा, अशी स्थिती झाली आहे. नवीन वर्ष सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी अजून व्यायामाचा श्रीगणेशा झाला नसेल, तर मकर संक्रांतीला सूर्याला अर्घ्य देत सूर्य नमस्काराने सुदृढ आरोग्याची सुरुवात करा. हळू हळू सरावाने पहाटे उठू लागलात की प्राणायाम आणि ध्यान धारणा करा. त्या निरव शांततेत तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकता येईल. मन शांत होईल. दिवसही आणि आगामी काळाची छान सुरुवात होईल.
हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.
प्रार्थना करा: देवाचिये द्वारी उभा क्षणभरी हा अभंग जणू आजच्या धकाधकीच्या जीवन शैलीला अनुसरूनच लिहिला असावा. परंतु, आपण क्षणभरही वेळ काढून देवाची भेट घेत नसू, तर फार मोठ्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपण गमावत आहोत, हे लक्षात घ्या. प्रार्थना देवासाठी नसून, ती आपल्यासाठी असते. काही मिळावे म्हणून प्रार्थना न करता जे मिळाले आहे त्याबद्दल आभार मानण्यासाठी देवासमोर हात जोडून कोणताही एक श्लोक मनापासून म्हणावा. श्लोक पाठ नसेल, तर दोन हस्तक तिसरे मस्तक एवढेही पुरेसे आहे. पण तेवढा वेळ काढाच!
जप किंवा ध्यान धारणा करा : ज्याप्रमाणे प्रार्थना महत्त्वाची, त्याच प्रमाणे ध्यानधारणाही महत्त्वाची. सतत मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर किंवा अन्य गॅझेट यांच्या वापरामुळे आपण आपले मनस्वास्थ गमावून बसलो आहोत. ते मिळवण्यासाठी काही क्षण शांत बसणे गरजेचे आहे. नुसते शांत बसण्याची आपली सवय तुटली असेल, तर जपाची माळ ओढावी. म्हणजे जप होईपर्यंत शांत स्थितीत बसणे होईल आणि नामस्मरणही घडेल.
मौन धरा : मौनं सर्वार्थ साध्यते, असे म्हणतात. पण मौन धरण्यासाठी प्रचंड संयम लागतो. दुसऱ्याचे ऐकून घेताना आपल्याला मौन ठेवावे लागते. रागाच्या क्षणी वाद वाढू नये म्हणून मौन बाळगावे लागते. भावनांचा कोंडमारा झाला की मौन धरावे लागते. बिकट परिस्थिती निवळेपर्यंत मौन धरावे लागते. मौनात खूप ताकद असते. हे मौन केल्याशिवाय कळत नाही. आपण अकारण किती बडबड करतो आणि ऊर्जा वाया घालवतो, हे आपल्याला मौन धरल्याशिवाय कळणार नाही.
आपले दोष दूर करण्याचा दृढ संकल्प करा : दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, असे म्हणतात. याचाच अर्थ दुसऱ्यांचे दोष काढण्यात आपल्या आयुष्याचा मोठा काळ वाया जातो. तोच काळ आपण आपल्या जडण घडणीत लावला, तर आपले आयुष्य अंतर्बाह्य बदलू शकेल.