- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )
परमेश्वराचे वर्णन करतांना शास्त्रकारांनी तो निर्गुण, निराकार, निरावयव, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त स्वभाव असे केले आहे. खरी गंमत ही की, असा निर्गुण परमात्मा भक्तीच्या शक्तीने सर्व संतांनी सगुण साकार केला. कधी तो राम झाला तर कधी कृष्ण झाला. कधी दत्त झाला तर कधी नृसिंह झाला. कच्छ, मच्छ, वराह, नृसिंह, बुद्ध हे सारे त्याचेच अवतार होत. पंढरीचा पांडुरंग हा भक्तांच्या भक्तीला धावून येतो. नाम जपता जपता नाम आणि नामी यांच्यातला भेद शिल्लकच राहत नाही.
नाम, नामी आणि नामधारक ही त्रिपुटी मावळून जाते आणि एकच अद्वैत शिल्लक राहते.संतश्रेष्ठ, देहूनिवासी, वैराग्यमूर्ती, जगद्गुरु, जगद्वंदनीय तुकाराम महाराज आपल्या अभंगातून हाच अद्वैताचा सिद्धांत प्रतिपादन करतात -
ध्यानी ध्याता पंढरीराया । मनासहित पालटे काया ।
तेथे बोल केवी उरी । माझे मी पण झाला हरी ।
चित्त चैतन्याशी पडता मिठी । दिसे हरिरुप अवघी सृष्टी ।
तुका म्हणे सांगो काय । एका एकी हरिवृत्तीमय ॥
पण साधकाची 'माझे मी पण झाला हरी' ही अवस्था होण्यासाठी त्याला परमोच्च प्रेमावस्थेत जावे लागेल. नाम धारकाने नाम घेता घेता ही एक भाव अवस्था प्राप्त करुन घ्यावी. नामाचा प्रवास जर नुसत्या वैखरीच्या स्टेशनवर थांबला तर त्याचा काय उपयोग..? वैखरीचा उपयोग फक्त नामाच्या सहवासात राहण्यासाठी पण सहवासातून अती उत्कट प्रेम निर्माण होते. रामकृष्ण परमहंस नेहमी जुन्या काळातला एक दृष्टांत देत असतं, ते म्हणत -
पूर्वी प्रथमतः पती आणि पत्नी अनोळखी घरातले असायचे. त्यांनी आधी कधीच एकमेकांना बघितलेले नसायचे. वडीलधाऱ्यांनी मुलगी बघितली आणि हा नवरोबा बोहल्यावर उभा राहिला ही पूर्वीची पद्धत होती पण लग्नाची अक्षत मस्तकावर पडून ती त्याची पत्नी घरात आली. दोघांचा सहवास वाढला. आता याला थोडे जरी दुःख झाले तरी पाण्यातल्या माशाप्रमाणे तिची तळमळ व्हायची. एका पतीच्या प्रेमासाठी ती संसारातलं सार दुःख सहन करायची हे सारं नातं, ओढ, प्रेम कशामुळे..? तर फक्त सहवासाने निर्माण झालं. तसं नित्य नामाच्या सहवासात राहिलात तर नामाबद्दल आपोआप प्रेम निर्माण होईल आणि तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होईल ही काळया दगडावरची रेघ..!
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )