-विवेक तेंडुलकरसर्व सणांचा राजा म्हणजे गणेशोत्सव! ह्या सणाची तयारीसुद्धा वेगळ्या उत्साहाने होत असते. तयारीचे काही मापदंडच ठरलेले असतात. पण ह्या वर्षी कोरोनामुळे काही परंपरा बदलाव्या लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या तयारीत कराव्या लागत असलेल्या तडजोडीचा वेध...कुठल्याही सणापेक्षा बाप्पा केव्हाही जवळचाच वाटतो मला. त्यामुळे अगदी शाळकरी वयापासूनच त्याच्या आगमनाचे कोण कौतुक! लहान होतो तेव्हा आईसोबत अलिबागेतल्या बाजारपेठेत जायचो खरेदीला. आवारण्याच्या- म्हणजे हरतालिकेच्या आदल्या दिवशी. तेव्हा अलिबाग हेही लहानसे गावच होते. फार काही दुकाने नव्हती. मिठाईची तर मोजून दोन दुकाने! दळीपात्रींच्या दुकानातून पूजेचे साहित्य, अत्तर वगैरे खरेदी करायचे. एसटी डेपोजवळून फळे-फुले. पर्यायही फार नसत आणि पैसेही. पण वातावरणाने मन मात्र काठोकाठ भरून जायचे. साधेपणातही कोण श्रीमंती दडलेली! पुढे मुंबईत काम आणि मुक्काम सुरू झाल्यावर सजावटीपासून अनेक गोष्टींची दालनेच खुली झाली. मग तर महिनाभर आधीपासूनच बाप्पासाठीची एकएक वस्तू खरेदी करणे सुरू झाले. जानवीजोड, कर्पासवस्त्रे दादरच्या गजानन बुक डेपोमधून, बाकीच्या अनेक वस्तू कीर्तिकर मंडईतून, काही वस्तू लालबागच्या पूजासाहित्य दुकानांतून, अत्तर परळच्या पटेल आत्तारीयांकडून, अगरबत्ती कुठूनही घेतली तरी, गौरीशंकर कॉर्नरवरल्या छोट्या दुकानांतून थोड्याफार घेतल्याशिवाय मन भरतच नाही! कंठीची निवड करायला हमखास दोनतीन दिवस जातातच! सजावटीचे कितीतरी सामान लोहारचाळीजवळूनच घ्यायचे, हा शिरस्ताच! सुरुवातीला एसटीने आणि नंतर स्वत:ची गाडी घेतल्यावर तिच्यातून पिशव्या अलिबागला घेऊन यायचे. एखादी वस्तू वेळेवर मिळाली नाही, तर जीवाला कोण रुखरुख लागते!ह्या वर्षी मात्र सगळीच अवघड परिस्थिती झाली. मार्च महिन्यापासून मुंबईत पाऊल ठेवणेच अशक्य झाले आणि बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईतून खरेदी करण्याची परंपरा खंडित झाली. शिरस्त्याप्रमाणे पुन्हा अलिबागेत आधीपासूनच खरेदी केली खरी, पण लॉकडाऊनमुळे फार काही उपलब्ध नसल्याने दुकाने सुनीसुनी वाटताहेत. जे उपलब्ध आहे त्यावर समाधान मानण्याशिवाय पर्याय नाही. गेली काही वर्षे मुंबईत माझ्यासोबत नित्यनेमाने खरेदीला असणारा माझा मित्र अमेय म्हणालाच, ‘दरवर्षी किती भरभरून खरेदी आणि तयारी करतो आपण... ह्या वर्षी सण आलाय असे वाटतच नाही.’ काहीही असो, बाप्पाचे आगमन आनंदात होणारच आणि सण साजरा होणारच! तयारी झाली असली तरीही, काहीतरी राहून गेल्यासारखे सारखेसारखे वाटतेय. सूर हरवल्यागत झालेय; पण, पुढल्या वर्षी पुन्हा सूर पहिल्यागत लागेल. बाप्पाला तसे साकडेच घालू या..!(लेखक ज्येष्ठ जाहिरात लेखक, दिग्दर्शक आणि राजकीय सल्लागार आहेत.)
...तरीही उरे काही उणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 3:22 AM