एका गावात एक फकीर होते. गावकरी त्यांना खूप मानत असत. त्या गावात एक महिला नवऱ्याच्या जाचाला कंटाळली होती. ती एकदा फकीराकडे गेली आणि म्हणाली, `बाबाजी, काहीतरी उपाय सांगा, जेणेकरून माझा नवरा माझा गुलाम बनेल.' अशी विचित्र मागणी ऐकून फकीर म्हणाले, `मी तुला एक ताविज देतो पण त्याला जोवर सिंहाचा केस गुंडाळणार नाही, तोवर ते प्रभावी बनणार नाही.'
हे ऐकून मागचा पुढचा विचार न करता ती बाई म्हणते, `काही हरकत नाही बाबाजी, मी आणेन सिंहाचा केस फक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला माझा गुलाम बनवा.'
असे म्हणून बाई निघून गेली. गावाच्या जवळच एक जंगल होते. तिथे एक सिंह येत असल्याचे बाईने ऐकले होते. त्याची भूकेची वेळ सरून गेल्यावर बाईने तिथे जायचे ठरवले. रोज ती त्या वेळेत जाऊ लागली. पोट भरलेल्या अवस्थेत सिंह तिच्याकडे बघत निघून जात असे. असे करत तिने एक दोन नाही, तर सहा महिने जंगलात जाण्याचा सपाटा लावला. सिंहाला तिचा चेहरा परिचित झाला. ती आपल्याला काही करणार नाही याची खात्री पटली. हळू हळू त्यांची मैत्री झाली आणि ती बाई चक्क सिंहाला गोंजारू लागली. अशात एक दिवस ती कात्री घेऊन गेली आणि तिने सिंहाचा एक केस कापून आणला.
दुसऱ्या दिवशी फकिरांकडे जात तिने तो सिंहाचा केस दाखवला व म्हणाली, `द्या आता मला ते ताविज!'
हे ऐकून चाट पडलेले फकीर बाबा तिला म्हणाले, `बाई सिंहाला काबीज करणारी तू, तुला ताविजची काय गरज? एका हिंस्त्र प्राण्याला लाडीगोडीने तू माणसाळलेल्या अवस्थेत आणू शकतेस तर नवऱ्याला काय घाबरते? कधी प्रेमाने, कधी लाडी गोडीने, कधी धाक दपटशा दाखवून त्यालाही असेच वश करून घे. सुखी संसाराचे मर्म हेच सांगते, की नवऱ्याला मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवले तर संसार सुखाचा होतो. नवऱ्याला गुलाम बनवून गुलामाची बायको म्हणवण्यापेक्षा त्याला राजा बनवून राजाची राणी बनून राहा. रागाने काहीच साध्य होत नाही, तर प्रेमानेच मन जिंकता येते. हेच मार्मिक विचाराचे ताविज घेऊन जा, तुझे नक्की भले होईल बघ!'
या गोष्टीप्रमाणे आपणही आपल्या नावडत्या व्यक्तीला प्रेमाने जिंकू शकतो. म्हणून सर्वांवर नि:स्वार्थपणे प्रेम करत राहा, जगा आणि जगू द्या!