भक्ताचे भगवंताच्या हृदयातील स्थान चिरंजीव रूपाने लोकांपुढे ठेवावे, अशी त्या भगवंताची इच्छा असते. भक्ताने काहीही मागितले नाही किंवा मागितले तरी त्याचा मान राखला जातो. उपेक्षा कधीही होत नाही. विवेकी भक्त अढळ स्थान मागतो किंवा भगवंताने कितीही विनवणी केली तरी नको म्हणतो. मला फक्त तू हवा एवढीच खऱ्या भक्ताची मागणी असते.
सतत भक्ताची काळजी वाहणाऱ्या भगवान कृष्णाने केदा राधेला विचारले, 'राधे, मला तुला काहीतरी द्यवेसे वाटते. तू कधीच काही मागत नाहीस. तेव्हा तुला काय देऊ बोल.' अनेक लोकापवाद सहन करणाऱ्या राधेने मला काहीच नको ही भूमिका पक्की धरली. व म्हणाली,'कृष्णा तू माझा आहेस ना? मग आता आणखी काय मागू?'
तरी कृष्णाला चैन पडेना. शेवटी त्याने म्हटले, 'राधे यापुढे कुणीही भक्त माझे गुणगान गाताना आधी तुझे नाव घेतील, एवढच नव्हे तर राधेचा कृष्ण अशीही मला ओळख मिळेल. हा नियम लोकांना पाळावा लागेल. जगाच्या अंतापर्यंत!'
तेव्हापासून राधाकृष्ण हे नाव प्रसिद्ध झाले. ही पदवी राधेला तिच्या निस्सीम भक्तीमुळे मिळाली. राधेचा आदर्श ठेवून आपणही परमेश्वराची भक्ती केली, तर त्याच्याकडे काही मागण्याची गरजच भासणार नाही. कारण आपण काही मागण्याआधीच भगवंत आपल्याला जे लागेल ते सर्वकाही देईल.
राधेकृष्ण हरी!