अलीकडच्या पिढीची मुले कधी, कुठे, काय बोलतील, सांगता येत नाही. मात्र, ती हे सगळे पोटात शिकून येत नाहीत, तर आपलेच शब्द, विचार, कृती ते टिपकागदासारखे टिपत असतात आणि त्याचीच परतफेड आपल्या कृतीतून, उक्तीतून करत असतात. म्हणून बालवयातच त्यांच्या जीभेला चांगले वळण देणे ही आपली जबाबदारी असते. आज आपण जे बोलू, तेच चार दिवसांनी मुलांकडून ऐकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. यासाठीच, बालसंस्कार अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांना बालपणीच जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायला शिकवले पाहिजे. मान दिला, तर मान मिळता़े अपमान केला, तर अपमान मिळतो. हीच जगाची रित आहे.
एका सराफाला नवसाने एक मुलगा झाला. तो वाईट संगतीला लागून उनाड बनल्यामुळे आईबापाचे बिलकुल ऐकत नसे. आपला परका न पाहता तोंडाला येईल ते बोलावे, सदा खावे, प्यावे आणि वेळ अवेळ न पाहता गावभर हिंडावे, असे तो करीत असे.
एका दिवाळीच्या दिवशी नगरशेठ दिवाणखान्यातील खुर्चीवर पाय हलवत आराम करत बसले असता, समोरील रस्त्यावरून जात असलेल्या सराफाच्या मुलाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्या शेठचे अगडबंब पोट शरीर पाहून उपहासाने तो सारखा हसू लागला. शेठला वाटले, की आपली श्रीमंती पाहून मुलाला आनंद वाटला असावा. दिपावलीनिमित्त त्याला काहीतरी बक्षिस द्यावे. अशा विचाराने शेठजींनी मुलाला बोलावून घेतले आणि हसण्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, `शेठजी खरे सांगू का तुम्हाला? आपले शरीर फारच स्थूल आहे. तुम्हाला जर याक्षणी जागच्या जागी मरण आले, तर खाली नेतेवेळी लोकांनी किती फजिती होईल. या विचाराने हसू आले.
हे ऐकून शेठजी संतापले. त्याला घरात डांबून ठेवले. सायंकाळ झाली, तरी मुलगा घरी न आल्याने सराफाला काळजी वाटू लागली. सराफ चौकशी करत करत शेठजींच्या घरी पोहोचला. शेठजींना मुलाचा जाब विचारला. शेठजींनी खरे कारण सांगून मुलाला डांबून ठेवल्याची कबुली दिली. सराफातला बाप जागा झाला. तो मुलाची वकिली करू लागला. `शेठजी, मुलांचे बोलणे कुठे मनावर घेता, त्यांना कुठे अक्कल असते, बोलण्याची. एकदा माफ करा आणि त्याला सोडून द्या. वास्तविक त्याने असे म्हणायला नको होते. कारण, त्याच्या म्हणण्यानुसार खरच असा प्रसंग भविष्यात उद्भवला, तर उचलून आणण्याऐवजी हात पाय तोडून पुढचे काम करता आले असते, पण एवढी त्याला अक्कल कुठे? हे लक्षात न आल्यामुळे तो काहितरी बरळला असावा.'
सराफाची मुक्ताफळे ऐकून शेठजींनी सराफालासुद्धा मुलाबरोबर खोलीत डांबून ठेवला. रात्र होत आली, तरी मुलाचा आणि नातवाचा पत्ता नाही, म्हणून सराफाचे वडील दोघांचा शोध घेत शेठजींकडे पोहोचले आणि त्या दोघांना सोडून द्या अशी विनवणी केली. त्या दोघांच्या चुका पदरात घेत आजोबा म्हणाले, `शेठजी, ते दोघेही अज्ञानी आहेत. त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. मी तर म्हणतो, अशी वेळ आली, तर दुसरा तिसरा विचार न करता हवेलीलाच अग्नि देवून टाका, म्हणजे काम झाले.'
आजोबांचे बोलणे ऐकून शेठजी चक्रावले. मुलावर अशा विचारांचा पगडा असल्यावर त्याच्याकडून तरी चांगले वागण्याची-बोलण्याची अपेक्षा तरी कशी करणार? शेठजीनेच माफी मागून त्या तिघांना सोडून दिले. कारण, मूर्खांशी वाद घालणे, म्हणजे मूर्खांची संख्या एकाने वाढवणे.