‘जसा आपला आहार, तसा आपला विचार’ या सर्वश्रृत ओळींमध्येच शब्दातील आशयघन दडला आहे. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ भक्षण करतो, त्यांचा आपल्या मन:स्थितीवर आणि आपल्या भावनांवर अतिशय परिणाम होतो. शुध्द, सात्विक खाद्यपदार्थाचे सेवन केल्याने अंतज्ञार्नाची, आपल्या आत्मवृत्तीची प्रवृद्धी करतात. उच्च पारमार्थिक प्रगतीसाठी सात्विक खाद्यपदार्थांचे अधिक सेवन करणे हे उत्तम, राजसिक खाद्य सामोपचाराने आणि तामसिक पदार्थांचे सेवन टाळणे हेच योग्य ठरते. म्हणजेच जेव्हा खाद्य शुद्ध असते, तेव्हा मन शुद्ध असते. जेव्हा मन शुद्ध असते, तेव्हा स्मरणशक्ति दृढ असते. आणि जेव्हा स्मरणशक्ति दृढ असते, तेव्हा मानवाला जी बंधने या सृष्टीला जखडून ठेवतात, ती बंधने शिथिल होतात. अर्थातच ‘जसा आपला आहार, तसे आपण’ या कल्पनेचा विस्तार करून आपल्या समागमाचीही आपल्या मन:स्थितीवर आणि भावनांवर परिणाम होतो. त्याही पलिकडे ‘जशी आपली संगति, तशी आपली मनोवृत्ती’ ही कल्पनाही तेवढीच महत्वाची आहे. तसेच आपल्या संगतीचा आपल्यावर प्रखर परिणाम होतो. मनुष्य ज्यांची संगत ठेवतो त्यांचे चारित्र्य, स्वभाव आत्मसात करतो. म्हणूनच आपल्या सोबत्यांची निवड विवेकपूर्वक केली पाहिजे. आपले शौच, शुद्धता, कायम ठेवण्यासाठी आपल्याभोवती सुशील, दैवी संगत ठेवणे आणि त्या व्यक्तीला इतरांपासून ओळखता येण्याचा विवेक असणे फार महत्वाचे आहे. कित्येक मूढ, भावनाप्रधान लोक, स्वत:ची पारमार्थिक वृत्ति दुसºया आत्म्याला अज्ञानाच्या अंध:कारातून मुक्त करू शकेल या विचाराने, जेथे महादेव जात नाहीत आणि देव जायला घाबरतात अशा स्थितीत जातात आणि कपटी, धूर्त लोकांच्या जगात प्रवेश करतात. आपण स्वत: मूढमति न व्हावे. उच्च आणि नीच मनोवृत्तीच्या लोकांना ओळखावे. उच्च मनोवृत्तीच्या लोकांनी उच्च मनोवृत्तीच्या लोकांना आपल्याभोवती प्रासारित करावे. मनाची शुद्धता आणि वर्तणुकीची शुद्धता या दोन गोष्टी मानवाच्या संगतीच्या शुद्धतेवर अवलंबून आहेत.
-हभप गजानन महाराज गोरखतरवाडी, ता. नांदुरा.