ज्योत्स्ना गाडगीळ
समर्थ रामदासांनी लिहिलेली `सुखकर्ता दु:खहर्ता' ही गणपतीची आबालवृद्धांना तोंडपाठ आहे. फक्त आरती म्हणता म्हणता उत्साहाच्या भरात गाडी घसरते आणि संकटी पावावे ऐवजी `संकष्टी पावावे' असा निरोप बाप्पाला धाडला जातो. मात्र, समर्थांनी जे मागणे मागितले आहे, ते लक्षात घेतले, तर भविष्यात संकटीऐवजी संकष्टी असा उच्चार होणारच नाही. काय आहे त्यांचे मागणे?
श्रीगणेश हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आणि आवडते दैवत. आपली सुखदु:खे आपण ज्याच्याजवळ विश्वासाने सांगू शकतो, तो आपला बाप्पा सुख देणारा आहे आणि दु:खाचे हरण करणारा म्हणजेच संकटांना पळवून लावणारादेखील आहे. म्हणून तर आपण त्याला `वार्ता विघ्नाची नुरवी' असे सांगतो. म्हणजे विघ्नेच काय तर त्याची वार्ता सुद्धा न उरवी, म्हणजे शिल्लक ठेवू नकोस, असे आपण सांगतो. मात्र, आरतीच्या ठेक्यात, लयीत गात असताना `नुरवी पुरवी प्रेम' असे म्हणत आपण स्वत:चीच गल्लत करतो. नुरवी पुरवी हे केवळ यमक जुळवले नसून, संकट उरवू नको पण प्रेम मात्र पुरव अशी प्रेमळ मागणी केली आहे.
हेही वाचा : अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...
ही मागणी कोणाकडे? तर ज्याची आमच्यावर कृपा आहे, ज्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि ज्याच्या गळ्यात मुक्ताफळांची म्हणजेच मोत्याची माळ आहे, अशा गणेशाला मोरया म्हणजे माझा नमस्कार असो.
बाप्पाला समर्थांनी मंगलमूर्ती म्हटले आहे, कारण तो अमंगळाचा नाश करतो. त्याचे नुसते दर्शनही मंगलमयी आहे. त्याला बघूनही प्रसन्न वाटते. त्याची कृपादृष्टी आश्वासक वाटते. ती पाहता मनोकामना आपसुक पूर्ण होईल, असा दिलासा वाटतो. यातही समर्थांच्या आरतीत केवळ मंगलमूर्ती असा उल्लेख आहे, परंतु भक्तांनी श्रीमंगलमूर्ती दिलेली जोडदेखील आता आरतीचाच एक भाग असल्यासारखी म्हटली जाते.
पुढच्या दोन्ही कडव्यांमध्ये समर्थांनी गणपती बाप्पाचे वैभवसंपन्न रूप रेखाटले आहे. गणपती, गणनायक या शब्दांमध्ये नेतृत्व सामावलेले आहे. युद्धकलेत निपुण असलेला बाप्पा पाशांकुशधारी आहे. मात्र, समर्थांनी या आरतीमध्ये केवळ बाप्पाचे वैभव दाखवले आहे. त्याच्या हाती शस्रास्रे न देता, त्याचे हात या महाराष्ट्राला आशीर्वाद देण्यासाठी आणि मोदक अर्थात आनंद देण्यासाठी मुक्त असल्याचे वर्णन केले आहे.
मात्र, आरती संपत असताना, श्रीगणेशाला आर्त साद देत विनंती केली आहे, `संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे' म्हणजेच देवा आमच्या संकटकाळात तर धावून येच, शिवाय आयुष्यात ज्या ज्या वेळी निर्वाणीचे म्हणजेच भावभावनांचा कडेलोट झाला, आणाीबाणीचा प्रसंग उभा ठाकला असे वाटेल, तेव्हा रक्षणार्थ धावून ये.' म्हणून हे मागणे केवळ `संकष्टी' पुरते न मागता दर संकटात त्याने धावून यावे, असे त्याला सांगावे. आणि आर्ततेने म्हणावे, `संकटी पावावे निर्वाणि रक्षावे.'
हेही वाचा : अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!