यशस्वी होण्याचे पहिले सूत्र आहे, ते म्हणजे पहाटे लवकर उठणे. ब्रह्म मुहूर्ताला जाग येणे उत्तम, परंतु इतक्या पहाटे उठणे शक्य नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी उठावे असा शास्त्राचा नियम आहे. आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत, 'लवकर निजे लवकर उठे, त्यासी आयुरारोग्य लाभे!' ही सवय अंगी बाणावी यासाठी सूर्य नमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणे या दोन गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला.
सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य द्यावे, असा संस्कार हिंदू धर्म शास्त्रात दिला आहे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणे हा त्याचा अपमान आहे. याउलट लवकर उठून सूर्य दर्शन घेणे आणि अर्घ्य देऊन त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्कार आहे. हा संस्कार बालपणापासून आपल्या मनावर रुजावा, म्हणून मुंज मुलाला वयाच्या आठव्या वर्षी उपनयन संस्कारात अर्घ्य देण्याचे महत्त्व शिकवले जाते. त्याने तो शिरस्ता आयुष्यभर पाळणे बंधनकारक असते.
सूर्याला अर्घ्य देण्यात सूर्याचा नाही तर आपलाच फायदा आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात होते. सूर्य दर्शन घेतल्यामुळे सूर्य प्रकाशात शरीर न्हाऊन निघते. त्यामुळे कोवळ्या सूर्य किरणांचा शरीराला पुरेपूर फायदा होतो. सूर्याप्रमाणे आपल्यालाही तेज लाभावे, ही भावना जागृत होते. त्याच्याप्रमाणे अथक परिश्रम घेण्याची मनाची तयारी होते आणि सूर्य ज्याप्रमाणे प्रकाश देताना कोणामध्येही दुजाभाव करत नाही, त्याप्रमाणे आपणही आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपले कार्य पार पडावे, ही मोठी शिकवण मिळते. म्हणून रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे.
अर्घ्य कसे देतात -
तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात लाल फुलं, अक्षता आणि कुंकू घालावे. ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावे. राहत्या वस्तीत, इमारतीत सूर्याला अशाप्रकारे अर्घ्य देणे शक्य नसल्यास ताम्हन घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून अर्घ्य द्यावे. नंतर ताम्हनातले पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना घालावे.
अर्घ्य देताना म्हणावयाचा मंत्र -
एहि सूर्य! सहस्त्रांशो! तेजो राशे! जगत्पते!अनुकम्प्यं मां भक्त्या गृहाणार्घ्य दिवाकर!
अर्थ : हे सूर्य देवता, तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे.
त्याचबरोबर सूर्याची बारा नवे घेत सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते. म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करा. तुम्हाला पाहून घरातली लहान मुलेसुद्धा तुमचे निश्चितच अनुकरण करतील.