या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिलच्या शेवटी म्हणजेच ३० एप्रिल रोजी होत आहे. हे सूर्यग्रहण खूप खास आहे, कारण शनी अमावस्याही याच दिवशी येत आहे. एवढेच नाही तर शनी अमावस्येच्या एक दिवस आधी म्हणजेच २९ एप्रिलला शनि राशी बदलत आहे, ज्याचा सूर्यग्रहणासोबतच लोकांच्या जीवनावरही परिणाम होणार आहे. ज्योतिषांच्या मते सूर्यग्रहणाच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ योग घडत आहे.
हिंदू नववर्ष विक्रम संवत २०७९ ची सुरुवात चैत्र मासाने झाली. तर चैत्र मासाचा शेवट अमावस्येच्या दिवशी सूर्य ग्रहणाने होत आहे. ज्योतिषांच्या मते, हिंदू नववर्ष विक्रम संवत्सराचा राजा शनि ग्रह आहे. अशा स्थितीत शनीचा मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याच वेळी, ३० एप्रिलला शनी अमावस्या आणि सूर्यग्रहणाचाही योग जुळून येत आहे. शनी हा सूर्य पुत्र आहे. या दोहोंचे स्थलांतर होत होत जवळपास १०० वर्षांनंतर पिता-पुत्राची समोरासमोर भेट होत आहे.
ज्योतिषांच्या मते, पिता पुत्राची ही भेट अनेक राशींसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडे साती आणि प्रभाव आहे त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत. त्यामुळे शनीचा अशुभ प्रभाव बऱ्याच अंशी कमी होईल. जसे की शनी किंवा हनुमानाचा जप, पूजा, दानधर्म, देव दर्शन इ...
वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी दुपारी १२. १५ वाजता सुरू होईल आणि पहाटे ४.०७ पर्यंत राहील. मात्र भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी होणार नाही. ग्रहणाचे वेध १२ तास आधी लागत असल्याने या काळातही शुभ कार्य केले जात नाही.
सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक ग्रहांचा योगायोग
अमावास्येला सूर्यग्रहण तसेच अनेक ग्रहांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. २९ एप्रिल रोजी तीस वर्षांनी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्याचा फायदा मेष, वृषभ आणि धनु राशीला होईल. सूर्यग्रहण मेष राशीमध्ये होत आहे आणि राहू आधीच मेष राशीत चंद्रासोबत बसला आहे. या ग्रहांच्या एकत्र येण्याने बारा राशींच्या जीवनातही अनेक बदल घडणार आहेत. काही राशींना चांगले तर काहींना या सूर्यग्रहणाचे मध्यम फळ मिळेल. यासाठीच सर्व राशींनी या काळात उचित दक्षता घेतली पाहिजे. या ग्रहण काळात महत्त्वाची कामे काही काळ लांबणीवर टाकली तर लाभ होईल. यथाशक्ती दान धर्म करावा. ग्रहण काळ पार पडला की सर्वकाही आलबेल होईल.