देव आहे की नाही, हा मोठा चर्चेचा विषय होऊ शकतो. आतापर्यंत त्यावर अनेक चर्चाही झालेल्या आहेत. मात्र, भारतात असे कोट्यवधी नागरिक आहेत, जे केवळ देवाला मानत नाहीत, तर दररोज त्याची भक्तीही करतात. देव जसा सगुण, साकार आहे, तसा तो निर्गुण निराकारही आहे. ज्या माणसाची जशी भक्ती, श्रद्धा असेल, तसा तो त्याला त्या स्वरुपात दिसत असतो. हीच शिकवण स्वामी समर्थांनी एका घटनेतून समाजाच्या पुनःप्रत्ययाला आणून दिली. जाणून घेऊया...
अक्कलकोटला आषाढी एकादशीचा मोठा उत्सव असतो. प्रतिवर्षीप्रमाणे स्वामींनी आपल्याच घरी आले पाहिजे, अशी चोळप्पाची इच्छा असते. केवळ चोळप्पा नाही, तर अक्कलकोटमधील अन्य तीन स्वामीभक्तांनाही तसेच वाटत असते. दुसरीकडे, स्वामींनी गावाच्या उत्सवाला हजर राहिले पाहिजे, असे बाळप्पांना वाटत होते. या मुद्द्यावरून या पाच जणांचा आपापसात वाद होतो. शेवटी यावर तोडगा काढण्यासाठी तिघेही स्वामींकडे येतात.
स्वामी या पाचही भक्तांची सर्वांची इच्छा आणि हट्ट ऐकून घेतात. स्वामी म्हणतात की, जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी, असे वाटत असेल, तर एक परीक्षा द्यावी लागेल. जो या परीक्षेत उतीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ. हातात तेलानी गच्च भरलेली पणती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून सर्वांनी स्वामींकडे यायचे. जो प्रथम स्वामींजवळ पोहोचेल, तो जिंकेल आणी स्वामी त्याच्याच घरी येतील, असा पण ठरतो. मात्र, हा पण पूर्ण करताना तेलाचा एकही थेंब सांडता कामा नेय, अशी अट स्वामी घालतात.
चोळप्पा सर्वप्रथम स्वामींकडे पोहोचतात. ते आनंदी होतात. पण स्वामी महाराज म्हणतात की, अरे पहिला तर आलास. मात्र, मनात नाव कुठे घेतलेस माझे? अशी विचारणा करून चोळप्पाला परीक्षेतून बाद करतात. सर्व जण अनुतीर्ण होतात. सगळे अगदी निराश होतात. स्वामींनी केवढी सोपी गोष्ट सांगितली होती. मात्र, तीदेखील पूर्ण करता आली नाही आणि स्वामी आता कुणाचकडे येणार नाहीत, याबाबत सर्वांना खंत वाटते. मी तुझ्याकडे येणार आहे. मात्र, तू कुणालाही सांगू नको, असे स्वामी सर्वांना रस्त्यात गाठून सांगतात.
आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या सर्वांमध्ये वाद होतो. चोळप्पा म्हणतात की, स्वामी त्यांचाकडे आले होते. अन्य तीन भक्तही हेच सांगतात. तर, बाळप्पा म्हणतात की, उगाच थापा मारू नका. स्वामी गावाच्या उत्सावातून कुठेही गेले नव्हते. पुन्हा शेवटी सर्वजण स्वामींकडे येतात.
स्वामी म्हणतात की, भगवंतांचे चैतन्यस्वरूप आपण विसरलात की काय, चैतन्याला स्थूल-देहाच्या मर्यादा नसतात. आम्ही तुमच्याच अंतरात वसलेले आहोत. फक्त गरज आहे की, ते शोधून काढायची. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वत्वाची जाणीव होईल आणि भगवंतांच्या नेमक्या स्वरुपाचे तुम्हाला दर्शन होईल. अरे 'अहं ब्रह्मास्मि', असे उगीच कोणी म्हटले आहे काय, केवळ तुमच्यातच नाही, भगवंत सर्व जीवांत वास करतो. म्हणून उगाच कुणालाही त्रास किंवा मनस्ताप देऊ नये, असा बोध स्वामी देतात. सर्वांना नेमके काय घडले, हे समजते.