Swami Samarth Maharaj Teachings: दत्तगुरुंच्या अवतारांपैकी एक आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचा मानणारा लाखोंचा समुदाय आहे. लाखो अनुयायी आहेत. स्वामी समर्थ महाराज यांच्या कृतीतून, उक्तीतून काही ना काही उपदेश मिळतो, असे भक्तगण सांगतात. स्वामींची उपासना न चुकता करतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींवरील अनेक साहित्यातून स्वामींशी निगडीत घटना, गोष्टी याची माहिती होते. तर स्वामींशी अनेक कथाही सांगितल्या जातात. यातून नेमका तो बोध घ्यावा, असे म्हटले जाते. एकदा स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण, अशी पैज लागली होती. यावेळी स्वामींनी केलेला उपदेश अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
एका कथेनुसार, स्वामींच्या श्रेष्ठ भक्ताला संपूर्ण एका महिन्यापर्यंत नैवेद्य अर्पण करण्याचा मान मिळणार असल्याची वार्ता पसरते. एक सावकार, एक हलवाई सदाशिव आणि एक गावकरी आपापला दावा करतात. हे तिघे जण स्वामींकडे येऊन आपल्याला हा मान मिळावा, अशी विनंती करतात. यावेळी, पुढील सात दिवसांत तुम्ही अशी कृती करा, जी सर्वोच्च असेल, अशी अट स्वामी ठेवतात. सावकार स्वामींची मूर्ती घडवायची, असे ठरवतात. हलवाई उत्तम मिठाई तयार करण्यासाठी कामाला लागतात. एके दिवशी सावकार आणि हलवाई रस्त्यात भेटतात. एकामेकांची निंदा करतात. आपलीच कृती सर्वोच्च ठरेल, असा दावाही करतात.
तेवढ्यात गावकरी एका घरात जाताना या दोघांना दिसतो. गावकरी त्या घरातून बाहेर पडल्यावर, आमचा मित्र इथे येऊन काय करत होता, असा प्रश्न ते दोघे घरातील एका व्यक्तीला विचारतात. यावर, आमच्यासोबत बसतात. गप्पा, गोष्टी होतात. चहा-पाणी घेऊन ते निघून जातात. बाकी काही नाही, असे उत्तर मिळते. ते दोघेही मनोमन आनंदून जातात. मुदत संपल्यावर स्वामी तिघांकडे जातात.
स्वामी प्रथम सावकाराकडे जाऊन त्यांनी घडवलेली मूर्ती पाहतात. मग हलवाईकडे जाऊन मिठाईची चव पाहतात. मग गावकऱ्याकडे जातात आणि विचारतात, तू काय केलेस? यावर, स्वामी मी काय विशेष करणार. मी फक्त तुमच्याबद्दल, तुमच्या लीलांबद्दल आणि तुमच्या सामर्थ्याबाबत लोकांना माहिती दिली. तुम्ही जो उपदेश करता, त्याबाबत लोकांना समजवून सांगितले. नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमची शिकवण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही प्रयत्न केले, असे गावकरी उत्तरतो.
यानंतर स्वामी गावकऱ्याला नैवेद्य अर्पण करायचा मान देत आहोत, असे जाहीर करतात. स्वामी गावकऱ्याला शाबासकीही देतात. सावकार आणि हलवाई यांना आश्चर्य वाटते. स्वामी त्यांना म्हणतात की, अरे संत-महंतांना देव का पाठवतो? अज्ञानी लोकांना सद्मार्गाचा रस्ता दाखवायला. त्यांना मार्गदर्शन करायला. प्रपंच करताना ईश्वराचे विस्मरण होऊ नये, ही आठवण करुन द्यायला. या गावकऱ्याने या कामात शक्य तसा हातभार लावला. अज्ञानी लोकांना सद्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. आमची शिकवण ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत ती पोहचवली. गुरूला मूर्तीचा काय लोभ? संत मिष्ठान्न ग्रहण करतात, ते भक्तांच्या समाधानासाठी. आम्हाला जे अपेक्षित होते, ते या गावकऱ्याने केले. म्हणून त्याची कृती सर्वश्रेष्ठ ठरली.
||श्री स्वामी समर्थ||