श्री स्वामी महाराज साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत. ते श्री दत्त, श्रीपाद स्वामी व नृसिंह सरस्वती असे आहेत. पुढील अवतार स्वामींचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत. गाणगापूर आपले मुख्य स्थान. त्याचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे, या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले. श्री स्वामींचे सर्व भक्त त्यास दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात.
गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे स्थान आहे. तेथे अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छा पूर्ण करून घेतात. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला प्रगट झाल्यापासून गाणगापुरच्या अनेक भक्तांना अक्कलकोटला जाऊन सेवा करण्याविषयी, दृष्टांत झाले आहेत.
एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आले. दर्शन झाल्यावर पुजाऱ्यास समर्थांनी 'तुमच्या देवाचे नाव काय?' म्हणून प्रश्न केला. पुजारी म्हणाले, 'महाराज, आमच्या देवास श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात.' हे ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नृसिंहभान आहे. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, कृष्ण झालो!' यावरून स्वामी महाराज अवतारी पुरुष होते हे सिद्ध झाले.
तीच बाब चिंतोपंत नावाच्या दत्त भक्तांची! त्यांना एकाने भाकीत सांगितले, 'काही दिवसांनी तुला सिद्ध पुरुषाचा सहवास घडेल व दत्त दर्शनाचा लाभ घडेल.' चिंतोपंतांना दत्त दर्शनाचा ध्यास होता. अशातच सिद्ध पुरुषाचे दर्शन घडेल हे भाकीत कळल्यावर त्यांना आनंद झाला. ते अक्कलकोट येथे गेले असता त्यांची व स्वामी समर्थांची भेट घडली. स्वामींनी त्यांच्या डोक्यावर वरद हस्त ठेवताच त्यांना दत्त दर्शन घडले.' त्यावेळेस चिंतोपंतांना उमगले, की स्वामीच दत्त अवतार आहेत.
तेव्हापासून गाणगापूर तसेच अन्य दत्त स्थानावर जाणारे दत्त भक्त अक्कलकोट येथे जाऊन स्वामींचे दर्शन घेऊ लागले.