>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
भक्तांना तारणारा “ स्वामी कृपा तारक मंत्र'' हा केवळ मंत्र नाही तर स्वामींनी भक्तांना दिलेले आश्वासन आहे. २६ एप्रिल रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने या मंत्राचे चिंतन करूया.
स्वामिनी भक्तांना दिलेला हा तारक मंत्र म्हणजे “संजीवनी'' आहे. पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभ्यातून अंतर्मनाने स्वामिना साद घातली तार तारक मंत्र म्हणताना स्वामी दर्शन ,प्रचीती देतात हा भक्तांचा अनुभव आहे .स्वामी म्हणजे स्वः मी ,माझ्याजवळ येताना तू तुझ्यातील “ मी'' ला सोडून ये ,तरच मी तुला दिसेन असेच जणू त्यांना सुचवायचे आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. स्वामिनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे जो माझे नाम घेईल, खऱ्या मनाने माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम ,चरितार्थ मी चालविन ,पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो तर तेच स्वामी हाकलून देतील आपल्याला . प्रपंच सांभाळून परमार्थ करावे हेच अपेक्षित आहे स्वामिना .
निशंक हो ! निर्भय हो! मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी ,अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी ।।१।।
कुठलीही शंका घेउन माझे नाम घेऊ नकोस, माझी सेवा करू नकोस ,अत्यंत निर्भय हो. कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस . पण आपण खरच तसे करतो का? नाही! किती वेळा तारक मंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो . ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणू त्याचवेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल. आपल्या पाठीशी उभे असलेले स्वमिबळ इतके प्रचंड आहे, की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो . त्यांच्या नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात ,त्यांची शक्ती आकलनाच्याही पलीकडे आहे . प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही. पण ते कधी ? जर त्यांना ते वाटले तर आणि तरच .उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात!
जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।।आज्ञेविना काळ ना नेई त्याला,परलोकीही ना भिती तयाला ।।२।।
आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावर मायेची पखरण करणाऱ्या स्वामिना त्रिवार वंदन .हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञे शिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही अशी ही अलौकिक शक्ती आहे. परलोकातसुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी!
उगाची भितोसी, भय हे पळू दे ,जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे।जगी जन्म-मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।
प्रपंचातील लहानसहान गोष्टीनी आपण सशासारखे घाबरतो ,भय आपली पाठ सोडत नाही ,आपल्या जीवाला शांतात मिळत नाही .म्हणूनच स्वामी सांगतात अरे वेड्या लहान सहान गोष्टीना उगाच कशाला भीतोस ? तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे तिला ओळखायला शिक. हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे पण आपण स्वामीसेवेत आहोत, त्यांचे बालक आहोत ह्याची खुणगाठ मनी ठेव!
खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।कितीदा दिला बोल! त्यांनीच हात,नको डगमगू स्वामी देतील साथ।।४।।
स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला “ स्वामी “ ह्या २ शब्दांचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तु स्वामीभक्त होऊ शकणार नाहीस. आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत . कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत ,त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर , अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत तेव्हा न डगमगता पुढे जात राहा.
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।हे तीर्थ घे ,आठवी रे प्रचिती ,न सोडी कदा, स्वामी ज्या घेई हाती।।५।।
प्राण , अपान, उदान ,व्यान ,उदान ,समान ह्या पंचप्राणामध्ये स्वामीच तर आहेत. स्वामीची विभूती आणि तीर्थ ह्यात सुद्धा स्वामींचा अंश आहेच .हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि कितीवेळा बाहेर काढले ,प्रचीती दिली ते आठव. श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत ही खुणगाठ मनाशी ठेव .
संपर्क : 8104639230