स्वामी समर्थांची करेल भक्ती, मिळेल त्याला सुख, शांती आणि मुक्ती! हा आहे स्वामी समर्थांच्या उपासनेचा महिमा! अनेकांना स्वामी भक्ती करावी असे मनापासून वाटते. परंतु उपासना नेमकी कशी करावी हेच कळत नाही. अध्यात्म मार्गात उपास आणि उपासना दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. उपास असो वा उपासना या देवाच्या नावे करत असलो तरी त्याचा लाभ आपल्याला होणार असतो. उपवासामुळे आपले मन बाह्य गोष्टींकडून अलिप्त होते आणि अंतर्मनाकडे झुकते. तर उपासनेमुळे मन एकाग्र होते आणि चिंता मिटते.
सद्यस्थितीत ज्यांना शक्य आहे, त्यांनी स्वामी भक्ती म्हणून गुरुवारचा उपास करावा. मात्र जे ज्येष्ठ नागरिक असतील, औषध, गोळ्या सुरू असतील, त्यांनी उपास न करता उपासनेवर भर द्यावा. जे उपास करणार असतील त्यांनी केवळ फलाहार करावा. उपासाचे पदार्थ खाण्यापेक्षा उपास न केलेला बरा. अशा वेळी उपासापेक्षा उपासना जास्त फलदायी ठरते.
त्यासाठी दैनंदिन पूजेत पुढील गोष्टींचा समावेश करा :
>> रोज सकाळी देवपूजेसाठी १० मिनिटं राखीव ठेवा. अंघोळ झाल्यावर स्वामींसमोर शांत चित्ताने बसा. दिवा लावा. उदबत्ती लावा. स्वामींना सुगंधी फुल अर्पण करा. या प्राथमिक उपचाराने तुमचे मन शांत व एकाग्र होईल.
>> त्यानंतर 'श्री स्वामी समर्थ' हा जप १०८ प्रमाणे ११ वेळा जपमाळ करा. ११ वेळा शक्य नसेल तर निदान १ वेळा जपमाळ करा.
>> स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय वाचा. आठवड्याभरात पूर्ण ग्रंथ वाचून होईल. हेच रुटीन पुढच्या आठवड्यात सुरु ठेवा.
>> अध्याय वाचून झाले की स्वामींचा तारक मंत्र म्हणा.
>> स्वामींजवळ ठेवलेले पाणी सगळ्या घरातल्याना तीर्थ म्हणून द्या.
अशी ही स्वामी उपासना तुम्हाला निश्चितच फलदायी ठरेल याबाबत निःशंक व्हा आणि निर्भय व्हा!