वर्ल्ड कप हातातून गेल्याचे दुःख भारतीयांना सलत होतेच, त्यात भर पडली वर्ल्ड कपवर पाय ठेवून बसलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूची! वर्ल्ड कप विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शचा वादग्रस्त फोटो समोर आला असून क्रिकेट चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही, तर काही क्रिकेट चाहत्यांनी तर मिशेल मार्शचा निषेध करत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयसीसीकडे केली आहे.
या सगळ्याचे कारण म्हणजे आपली हिंदू संस्कृती. आपण भारतीय अतिशय भावनिक आहोत. मातृभूमीला वंदन करतो, मातीचा टिळा लावतो. झाडं, वेली, वृक्षांची पूजा करून त्यांच्याप्रती वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यामुळे पुरस्कार रुपी मिळालेल्या वर्ल्डकपवर पाय ठेवून फोटो काढण्याचा उन्माद आपल्या पचनी पडणारा नाही. म्हणूनच की काय, कालपासून वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेल्या या फोटोवर भारतीयांनी टीकेची झोड उठवली आहे. एवढेच नाही, तर कपिल देव यांनी जिंकलेला वर्ल्ड कपचा डोक्यावर मिरवतानाचा फोटो जोडून दोन संस्कृतींमधला फरक दाखवला जात आहे. पण हा मतभेद आजचा नाही तर पूर्वावर चालत आला आहे. याबाबत पुलं देशपांडे यांचं विधान आणि स्वामी विवेकानंद यांची एक गोष्ट आठवते.
देशी आणि विदेशी संस्कृतीतला फरक दर्शवताना पुलं म्हणाले होते, 'त्यांची द्राक्ष संस्कृती आहे तर आपली रुद्राक्ष संस्कृती आहे!'
तर विवेकानंदांच्या बाबतीत घडलेला एक किस्सा असा, की एकदा एका राजाने त्यांना आपल्या घरी आमंत्रित केले. हिंदू संस्कृतीचा मत्सर असल्याने स्वामींना खिजवण्यासाठी तो म्हणाला, 'दगडाला, धातूच्या तुकड्यांना तुम्ही देव मानता हे काही पटत नाही.' स्वामी शांत बसले.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर स्वामींचं लक्ष त्यांच्या घरात भिंतीवर टांगलेल्या तसबिरीकडे गेलं. ते कोण आहेत असं स्वामीजींनी विचारलं. राजाने अतिशयअभिमानाने, उर भरून कौतुक करत म्हटलं, 'ही माझ्या वडिलांची तसबीर आहे.' स्वामीजी म्हणाले, 'छान आहे. या तसबिरीवर तुम्ही थुंका.' राजाला राग आला. तो म्हणाला, 'कसं शक्य आहे? हे माझे वडील आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे!' स्वामी म्हणाले, 'हे वडील कसे काय? ही तर कागद, पुठ्ठा, काच, धागा वापरून बनवलेली तसबीर आहे. प्रत्यक्ष तुमचे वडील नाहीत.'राजाला स्वामींच्या बोलण्यातला अर्थ उमगला, तो खजील झाला. त्यावर स्वामीजी म्हणाले, 'तुझ्यासाठी जशी ही तसबीर म्हणजे तुझे वडील, तशी आमच्यासाठी दगड, धातूंपासून बनवलेली मूर्ती म्हणजे आमचा देव आहे!'
हा दोन संस्कृतीतला आणि दृष्टिकोनातला फरक आहे. संस्कृती म्हणजे तरी काय? तर प्रत्येक जीव, प्रत्येक घटकाचा सन्मान करणे. कोणाला पाय लागला तरी आपण नमस्कार करतो, सायंकाळी वृक्ष, वेली झोपी जातात आणि त्यांच्यावर पोसले जाणारे जीव विश्रांती घेतात म्हणून आपण त्यांना स्पर्श करणे टाळतो, बाजूने ऍम्ब्युलन्स गेली तरी आतल्या अपरिचित माणसासाठी मनोमन प्रार्थना करतो. हे संस्कार म्हणजेच संस्कृती. खेळ फक्त मैदानापुरता मर्यादित नाही, तर मैदानाबाहेर एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे वागता बोलता यावरही तुमचे जेतेपद अवलंबून असते. मिशेल मार्शने जगाच्या नजरेत वर्ल्ड कप पटकावला असेल पण ज्या भारताने त्यांना आमंत्रण दिले, त्यांच्या मनातून त्याने त्याचे महत्त्व कमी केले हे नक्की!