झोपेत सगळ्यांनाच स्वप्नं पडतात असे नाही, तर काही जणांची झोप स्वप्न पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. स्वप्न न पडणारे सुखी तर स्वप्नांनी भंडावून झोप अर्धवट राहणारे दुःखी, अशी तूर्तास व्याख्या आपण करू शकतो. स्वप्न पडणाऱ्यांच्या बाबतीत सांगायचे, तर दिवसभरातल्या अनेक गोष्टी, तसेच काही आठवणीतल्या घटना स्वप्नरूप होऊन मनात घोळतात आणि रात्री स्वप्नात दिसतात
स्वप्न छान असेल तर हरकत नाही, मात्र वाईट स्वप्न पडले तर ते झोपेतून जागे झाल्यावरही दीर्घकाळ लक्षात राहते आणि त्याच त्याच विचारांनी मन अस्वस्थ होते. विशेषतः स्वप्नात आपण कोणाचा मृत्यू पाहतो, अपघात पाहतो, आजारी पाहतो ते पाहून पुढे काय होईल या विचाराने मन उद्विग्न होते. त्या स्वप्नांचा अर्थ शोधत आपण शुभ अशुभ घटनांशी संबंध जोडतो. याबाबत स्वप्नशास्त्र काय सांगते ते जाणून घेऊ
मृत्यूचे भय
मृत्यूला मी घाबरत नाही असे म्हणणारेसुद्धा एखाद्या आजाराने, अपघाताने मृत्यू समोर दिसू लागला की बिथरू लागतात. मग ते सत्य असो नाहीतर स्वप्न! स्वप्नात स्वतःला मृत्यू अवस्थेत पाहणे स्वप्न शास्त्रानुसार असे स्वप्न शुभ मानले जाते. तसे स्वप्न दिसणे म्हणजे आयुष्यातून एखादे मोठे संकट दूर होणार आहे. त्यामुळे 'आपुले मरण पाहिले म्या डोळा'अशी जरी अवस्था झाली तरी घाबरू नका, कारण तसे स्वप्न शुभ असते
कौटुंबिक सदस्याचा मृत्यू
कौटुंबिक सदस्यांबद्दल आपल्या मनात प्रचंड जिव्हाळा असतो. त्यांचा मृत्यू तर दूरच पण साधा वियोगही आपल्याला सहन होत नाही. त्यांच्याबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे. याच काळजीपोटी अस्वस्थ मनाने एखाद्या कुटुंब सदस्याच्या मृत्यूचे स्वप्न पडणे आणि त्यानंतर मन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. याबाबत स्वप्न शास्त्र सांगते, असे स्वप्न पडल्यास त्या व्यक्तीचे आयुर्मान वाढते आणि त्यांच्यावर आलेले संकट दूर होते. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. मात्र, मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर ती व्यक्ती आपल्याला काही सांगू इच्छित आहे असे समजावे. त्यांना दिलेला शब्द आपण पाळला नसेल, त्यांचे स्वप्न आपल्याकडून अपुरे राहिले असेल तर अशी सूचक स्वप्न पडतात. त्या स्वप्नांकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे
प्रेतयात्रा दिसणे
स्वप्नात तुम्हाला प्रेतयात्रा दिसली तर ते शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ आहात. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार असल्याचे ते चिन्ह आहे. म्हणून स्वप्नात प्रेतयात्रा पाहून दचकू नका, तर ते स्वप्न आहे असे मनाला सांगा आणि त्याचे शुभ फळ मिळवा
पहाटेची स्वप्न
स्वप्न्शास्त्र सांगते, की पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. मात्र असेही म्हटले आहे, की जेव्हा आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचे स्वप्न पहाटे पाहतो, याचा अर्थ त्याला मृत्यू येणार आहे असे नाही, तर ती व्यक्ती मोठ्या संकटात पडणार असल्याचीही ती सूचना असते. अशा वेळी खंबीरपणे त्या व्यक्तीची पाठराखण करणे ही आपली जबाबदारी असते हे लक्षात ठेवा