आपल्याला औषधांची एवढी सवय लागली आहे, की थोडं काही कमी जास्त झालं की आपण लगेच मेडिसिन घेऊन मोकळे होतो. घरगुती उपचार, दोन तीन दिवस पथ्य पाणी या गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात आणि तत्काळ परिणाम हवा असतो. त्यामुळे आपल्या शरीराला औषधांची सवय लागते आणि ते घेतले नाही तर आपल्याला मानसिक रीत्याही बरे वाटत नाही.
पण औषध हे केवळ आजारी वाटल्यावर घ्यायचे असते का? आजार होऊच नये असे वाटत असेल तर औषधाची पुढे दिलेली मात्रा सुरू करा. त्याचे साईड इफेक्ट तर नाहीच, शिवाय नेहमी घेत राहिलात तर लाभच लाभ आहेत. यावरून एक सुभाषित आठवलं,
पथ्ये सति गदार्तस्य किमौषधिनिषेवणैः ।पथ्येऽसति गदार्तस्य किमौषधिनिषेवणैः ॥
अर्थात पथ्य पाळली नाहीत तर औषध घेऊनही काहीच उपयोग नाही आणि पथ्य वेळेत पाळली तर औषधाचीच गरज नाही! याकरिता जाणून घेऊ ती पथ्य, जी पाळली असता नानाविध आजारांपासून आपले संरक्षण होईल.
- व्यायाम हे औषध आहे.
- उपवास हे औषध आहे.
- निरसगोर्पचार हे औषध आहे.
- खळखळून हसणे हे औषध आहे.
- भाजीपाला हे औषध आहे.
- गाढ झोप हे औषध आहे.
- स्वच्छ सूर्यप्रकाश हे औषध आहे .
- कृतज्ञता आणि प्रेम हे औषध आहे.
- चांगले मित्र हे औषध आहे.
- ध्यानधारणा हे औषध आहे.
- काही प्रसंगी मौन आणि एकांतवास हे औषध आहे.
- आपल्या आवडत्या माणसाशी मोकळेपणाने बोलणे हे सगळ्यात मोठे औषध आहे.
ही औषधं मेडिकलमध्ये नाही तर घरातच मिळतील. तूर्तास ती कुठे हरवली आहेत ते शोधा आणि लगेच मात्रा सुरू करा!