>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२६ मे ते १ जून===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी पेलायला थोडा अवघड असला तरी हताश होण्याचे कारण नाही. कारण यातूनच तुम्ही सुधारणा करु शकणार आहात. आत्मचिंतन करु शकणार आहात. काही प्रमाणत ताण किंवा दडपण येऊ शकते, पण निराश होऊ नका. कामामध्ये तुम्ही शेवटच्या टप्प्याजवळ पोचणार आहात पण इथे तुमची परीक्षा होणार आहे. मनाने भक्कम राहून पुढची वाटचाल केली तर काही प्रमाणात यश मिळेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही खूप गोष्टी एका वेळी अंगावर घेऊ नका. इतरांच्या बोलण्याने किंवा वागण्याने स्वतःला त्रास करुन घेऊ नका. अतिविचार करणे सोडा. परिस्थिती प्रतिकूल असताना मनाने खंबीर रहा. एकटे पडू नका. चार चौघात बोलून मोकळे व्हा. डोके, डोळे, पाठ, कंबर यांची विशेष काळजी घ्या. गरज वाटत असेल तर विश्रांती घ्या.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी भावनांचे प्राधान्य घेऊन येत आहे. मन काय सांगत आहे त्याप्रमाणे वागावं लागेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, महत्वाचे संवाद घडतील. घरात किंवा नोकरीमध्ये चांगल्या लोकांचा प्रभाव राहील. प्रेमळ, आदराने वागवणारे, समजून घेणारे लोक भेटतील. तुमच्या कलेला वाव मिळेल. काही प्रमाणात राजकारण घडू शकते. कामामध्ये एक प्रकारचा टप्पा गाठला जाईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचे वागणे बोलणे चांगले सुसंस्कृत ठेवण्याची गरज आहे. भावनेच्या भरात टोक गाठू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. मोठ्यांसमोर नमतं घ्या. बोलून घाण करू नका, कोणालाही हिणवू नका. कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. तुमच्या जवळच्या व्यक्तींची चांगली काळजी घ्या. ऐकावं मनाचं करावं मनाचं, याप्रमाणे वागा!
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्या साठी थोडा आरामाचा विरंगुळ्याचा असणार आहे. तुम्ही पूर्वी बरेच श्रम केले आहेत, आता या आठवड्यात तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. तुम्हाला तुमचा स्वतंत्र वेळ मिळेल, या निवांतपणात तुम्ही आत्मपरीक्षण करू शकाल आणि काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करू शकता. तुम्ही भौतिक सुखात आरामात असाल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही काळजी सोडून आहे त्या काळाचा आनंद घेण्याची गरज आहे. एकटे असताना कोणत्याही गोष्टीचा अतीविचार करू नका. हा वेळ आत्मपरीक्षण आणि स्वतः मधे सुधारणा करण्यासाठी वापरा. जरी तुमच्याकडे चांगली संपन्नता असली तरी वस्तूंचा अतिरेक वापर करू नका. गरजेपुरताच वापर करा. आनंद उपभोगताना अत्यंत विनम्र रहा, जमिनीवर रहा, कसलाही दिखावेपणा करू नका!
श्रीस्वामी समर्थ.